छत्रपती संभाजीनगर : शरीरावर १८ ते २० वार करून विद्यार्थ्याचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास उस्मानपुरा परिसरातील म्हाडा कॉलनीत घडली. प्रदीप विश्वनाथ निपटे (१९, रा. पिंपरखेड, जि. बीड, ह.मु. म्हाडा कॉलनी) असे मृताचे नाव आहे.
विश्वनाथ निपटे (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मोठा मुलगा प्रदीप हा देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. सहा दिवसांपासून तो नातेवाईक अमर शिंदे, अर्जुन कवचट आणि मित्र अभिषेक लव्हाळे, महेश चव्हाण यांच्यासोबत उस्मानपुरा परिसरात म्हाडा कॉलनी येथे सात हजार रुपये भाडे देऊन फ्लॅटमध्ये राहात होता. त्यापूर्वी तो मित्रांसोबत दशमेशनगरातील रूममध्ये राहायचा.
दरम्यान, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी हे घरी असताना मामेभाऊ विकास फरतोडे (रा. शिवाजीनगर) यांनी फोन करून प्रदीपला मारहाण करण्यात आली असून, तो जखमी असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादी हे नातेवाइकांसह प्रदीपला भेटण्यासाठी निघाले. मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास ते शहरात आले. ते घाटी रुग्णालयात आले असताना प्रदीपचा रूम पाटर्नर अमर शिंदेकडे घटनेबाबत चौकशी केली.
तेव्हा अमरने सांगितले, की मकरसंक्रांतीची सुटी असल्याने सर्वजण रूमवर होते. सायंकाळी सहाच्या सुमारास अमर हा रीडिंगसाठी निघाला, तेव्हा प्रदीप हा रूममध्ये अंथरुणावर मोबाइल पाहात होता. रात्री साडेनऊच्या सुमारास अमर रीडिंगवरून घरी परतला असता, प्रदीप झोपलेला दिसला. त्यामुळे अमरने त्याला उठवले नाही.
थोड्या वेळाने रूम पार्टनर अभिषेक लव्हाळे, महेश चव्हाण आणि अर्जुन कवचट रूमवर आले. त्यानंतर जेवणासाठी म्हणून प्रदीपला उठविण्यासाठी त्याच्या अंगावरील ब्लँकेट काढले असता, तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या अंगा-तोंडावर, हातावर व मानेवर तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखमा दिसल्या. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मित्रांचीही चौकशीसहायक आयुक्त रंजित पाटील हे सकाळपासून पोलिस ठाण्यात होते. काही दिवसांपूर्वी स्थानिक मुले आणि प्रदीप यांच्यात वाद झाला होता. त्यातूनच हा खून झाला का, यासाठी पोलिसांनी परिसरातील तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. सायंकाळी सहा ते रात्री नऊदरम्यान प्रदीपचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी प्रदीपच्या चारही रूमपार्टनरसह मित्रांची चौकशी केली. दिवसभरात १४ ते १५ तरुणांची चौकशी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे दोन, तर उस्मानपुरा पोलिस ठाण्याची दोन अशी चार पथके शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तर तो जिवंत असता...प्रदीप हा कराटेमध्ये ब्लॅकबेल्ट होता. त्याला जर संधी मिळाली असती, तर त्याने प्रतिकार केला असता. आज तो जिवंत असता, असे म्हणत प्रदीपच्या वडिलांनी टाहो फोडला.
खोलीतून मोबाइल गायबअज्ञात आरोपीने खून केला असला, तरी रूममध्ये सर्व वस्तू जागेवर होत्या. त्यामुळे आरोपीने झोपेतच प्रदीपवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याला झोपवून कमरेवर बसून मागून त्याच्यावर वार केले असण्याची शक्यता असून, हातावर तीन तर पाठीवर ८ ते १० वार केले आहेत. संपूर्ण शरीरावर १८ ते २० जखमा आढळल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, रूममधून प्रदीपचा मोबाइल गायब असून, त्याचा शोध सुरू आहे.