विदर्भ क्रिकेट टीमने कॅप्टन करुण नायर याच्या नेतृत्वात विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 या हंगामातील अंतिम फेरीत धडक मारली आहे. विदर्भाने महाराष्ट्रावर 69 धावांनी मात करत अंतिम फेरी गाठली. विदर्भाने महाराष्ट्राला विजयासाठी 381 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. महाराष्ट्रानेही या आव्हानाचा पाठलाग करताना जोरदार झुंज दिली. मात्र महाराष्ट्राला 50 ओव्हमध्ये 7 विकेट्स गमावून 311 धावांपर्यंतच मजल मारता आली. आता 18 जानेवारी रोजी कर्नाटक विरुद्ध विदर्भ यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. कर्नाटकाने 15 जानेवारीला हरयाणावर 5 विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री मारली होती.
विदर्भासाठी यश राठोड आणि ध्रुव शोरी या सलामी जोडीने शतकी खेळी केली. यशने 116 तर ध्रुवने 114 धावांची खेळी केली. त्यानंतर जितेश शर्मा याने 33 चेंडूत 51 धावा केल्या. तर अखेरच्या काही षटकांमध्ये करुण नायर याने झंझावाती खेळी केली. विदर्भाने शेवटच्या 5 षटकांमध्ये 92 धावा जोडल्या. या धावा सामन्याच्या निकालात निर्णायक ठरल्या, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. विदर्भाने या चौघांनी केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर 3 विकेट्स गमावून 380 धावा केल्या.
महाराष्ट्राच्या फलंदाजांनीही विजयी आव्हानाचा पाठलाग करताना चिवट झुंज दिली. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. ऋतुराजने 7 धावा केल्या. मात्र महाराष्ट्राच्या इतर फलंदाजांपैकी एकालाही शेवटपर्यंत टिकून राहून महाराष्ट्राला विजयी करण्यात यश आलं नाही. महाराष्ट्रकडून सोलापूरकर अर्शीन कुलकर्णी याने झुंजार खेळी केली. तसेच इतरांनाही चांगली सुरुवात मिळाली. मात्र विदर्भाच्या गोलंदाजांसमोर कुणाला फार मोठी खेळी करता आली नाही.
अर्शीनने 101 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 8 फोरसह 90 रन्स केल्या. अंकीत बावणे याने 50 धावांची खेळी केली. निखील नाईकने 49 धावांचं योगदान दिलं. सिद्धेश वीर याने 30 धावा केल्या. अझीम काझी 29 आणि राहुल त्रिपाठीने 27 धावा जोडल्या. तर सत्यजीत बच्छाव आणि मुकेश चौधरी ही जोडी नाबाद परतली. सत्यजीतने 20 तर मुकेशने 2 धावा केल्या. महाराष्ट्रने अशाप्रकारे 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 311 धावा केल्या. विदर्भाकडून दर्शन नळकांडे आणि नचिकेत भुते या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर पार्थ रेखाडे याने 1 विकेट मिळवली.
विदर्भाची अंतिम फेरीत धडक
महाराष्ट्र प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, सिद्धेश वीर, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, अझीम काझी, निखिल नाईक (विकेटकीपर), सत्यजीत बच्छाव, मुकेश चौधरी, रजनीश गुरबानी आआमि प्रदीप दधे.
विदर्भ प्लेइंग इलेव्हन : करुण नायर (कर्णधार), ध्रुव शोरे, यश राठोड, अपूर्व वानखडे, जितेश शर्मा (विकेटकीपर), शुभम दुबे, हर्ष दुबे, नचिकेत भुते, पार्थ रेखाडे, यश ठाकूर आणि दर्शन नळकांडे.