- हृषीकेश शेलार, स्नेहा काटे- शेलार
मैत्री ही प्रत्येक नात्याचा आत्मा असते. नातं कोणतंही असो, त्याला मैत्रीची जोड मिळाली, की ते अधिक घट्ट होतं. अभिनेता हृषीकेश शेलार आणि त्याची पत्नी स्नेहा काटे- शेलार यांच्या नात्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची घट्ट मैत्री. रंगभूमीवरून सुरू झालेला हा प्रवास आजही मैत्रीच्या एका घट्ट धाग्यात बांधलेला आहे. त्यांच्या या सुंदर नात्याविषयी दोघांनी त्यांच्या भावना उघड केल्या.
हृषीकेश म्हणाला, ‘स्नेहा माझी पत्नी आहेच; पण त्याआधी ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आमची पहिली भेट मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स ऑफ थिएटर आर्ट्सच्या कोर्सदरम्यान झाली. ती माझी सीनियर होती. माझ्या पहिल्या ऑडिशनवेळी ती उपस्थित होती. त्यावेळी तिला माझं काम खूप आवडलं, आणि तिथूनच आमची मैत्री सुरू झाली.’
तो पुढे म्हणाला, ‘स्नेहा माझ्या आयुष्यात प्रेरणा आहे. तिचा संयमी स्वभाव, बिकट परिस्थितीतही खचून न जाण्याची तिची वृत्ती मला नेहमीच प्रेरित करते. मी बऱ्याचदा गोंधळून जातो; पण ती मात्र योग्य निर्णय घेऊन लगेच अंमलबजावणी करते. तिच्या आत्मविश्वासाने आणि समजूतदारपणानं ती घर आणि माझं कुटुंब सांभाळते, त्यामुळे मी माझं काम निर्धास्तपणे करू शकतो.
ती मला प्रत्येक क्षण जगायला शिकवते. तिचं एक्स्ट्रोवर्ट व्यक्तिमत्त्व, लोकांमध्ये पटकन मिसळण्याची क्षमता, आणि प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण वागण्याचा स्वभाव मला खूप भावतो. तिच्या या गुणांमुळे मी तिचा चाहता आहे. आमचं नातं ही मैत्रीची खरी ओळख आहे.’
स्नेहा म्हणाली, ‘हृषीकेश माझा नवरा आहे; पण त्याआधी तो माझा सच्चा मित्र आहे. आमची मैत्री त्याच्या शांत स्वभावामुळे आणि समजूतदारपणामुळे घट्ट झाली. एकमेकांच्या कामाचं कौतुक करतच आमचं नातं वाढलं.’
हृषीकेशने सांगितलेला एक खास किस्सा म्हणजे, ‘लग्नाआधी आम्ही एकत्र केलेला विमानप्रवास माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. तो माझा पहिलाच विमानप्रवास होता. मला नेहमी असं वाटायचं, की पहिला विमानप्रवास मी माझ्या कामानिमित्त करेन आणि अगदी तसंच झालं. आम्हा दोघांना लखनौमध्ये एका हिंदी चित्रपटाच्या शूटसाठी बोलावलं होतं. तो माझा पहिला विमानप्रवास जो माझ्या कामानिमित्त झाला आणि तो देखील स्नेहासोबत.’
स्नेहा म्हणाली, ‘माझ्या मते, मैत्री ही आरशासारखी असते. आरसा आपल्याला कधीच खोटं दाखवत नाही, तसंच खरे मित्रही नेहमी प्रामाणिक असतात. आपल्यातल्या वाईट गोष्टी दाखवून आपलं व्यक्तिमत्त्व अधिक चांगलं बनवण्याचं काम मित्र करतात. हृषीकेश हा माझ्या आयुष्यातला तो आरसा आहे, ज्यामुळे मी अधिक सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण झाली आहे. तो नवरा असण्याआधी माझा मित्र आहे आणि नेहमी राहील.’
(शब्दांकन : मयूरी गावडे)