- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
चिंता कोणाला नसते? कमी-जास्त प्रमाणात चिंता सगळ्यांच्याच आयुष्यात निर्माण होत असते. पूर्णपणे चिंतामुक्त होण्यासाठी खूप धैर्य लागतं, आणि स्वतःवर व स्वतःच्या मनावर खूप काम करायला लागतं आणि त्यासाठी मनाचा नियमित अभ्यासही लागतो. हे सगळ्यांना जमेल असं नाही.
चिंता वेगवेगळ्या स्वरूपात उपस्थित होत असते. कुणाला नोकरीची चिंता, कुणाला पैशांची चिंता, कुणाला मुलांच्या भविष्याची चिंता, कुणाला तब्येतीची चिंता. आणि या पलीकडे, वेगवेगळ्या परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या तत्कालीन चिंता या वेगळ्याच. त्यामुळे, पूर्णपणे चिंतामुक्त होणं सर्वसामान्य व्यक्तीला तितकंसं शक्य नाही, ही वास्तविकता आहे.
मात्र, ‘चिंता’ हे अनेक मानसिक आणि शारीरिक समस्यांना आपल्या आयुष्यात प्रवेश देण्यात कारणीभूत ठरते हेही तितकंच खरं. मग ती कशी कमी करायची? आणि चिंता दूर होईपर्यंत चिंताग्रस्त मनाला ‘मॅनेज’ कसं करायचं? या दोन्ही पैलूंचा विचार करायला हवा. जागरूकपणे चिंता कशी कमी करायची हे आपण आज बघुयात.
चिंता वाटणं, हा एक स्वाभाविक भावनिक अनुभव आहे हे लक्षात घेऊया. त्यामुळे मुळात चिंता वाटणं हा काही दोष नाही, दुर्गुण नाही. चिंता करण्याची सवय होते, किंवा चिंतेनं आपण सतत ग्रस्त होत असलो, तर ते आपल्यासाठी चांगलं नाही. आपण प्रामुख्यानं, दोन प्रकारे चिंता अनुभवतो - काळजी आणि भीती.
बहुतांश वेळा, चिंता आपल्या विचारांमध्ये आणि काल्पनिक काळजीमध्ये जास्त असते. किंवा वर्तमान स्थितीमुळे भविष्यात कदाचित होणाऱ्या परिणामाच्या भीतीमुळे आपल्याला चिंता वाटत असते. उदाहरणार्थ, आपल्या करिअरबद्दल, स्वास्थ्याबद्दल; कुटुंबातील समस्यांवरून, नातेसंबंधांवरून, मुलांचं संगोपन, अभ्यास, त्यांचं भविष्य अशा अनेक गोष्टींची अनेकवेळेला आपण महिला काळजी करतो आणि अनेकदा चिंताग्रस्त होतो.
एखाद्या आईला किंवा वडिलांना, आपल्या मुलांना एकटं सोडण्याची भीती वाटत असते, आणि मुलं कुठं एकटी फिरायला गेली, तर त्यांना सतत भीती वाटत राहते आणि मग ती चिंताग्रस्त होतात.
समस्या छोट्या असो किंवा मोठ्या असो, त्यांचा आपण कधी नकळतपणे अतिविचार करतो हे आपल्यालाही समजत नाही आणि कुठंतरी चिंता करण्याचा एक स्वभाव बनू लागतो. मग अतिविचार, अस्वस्थपणा, रात्री झोप न लागणं, भीती आणि असुरक्षितता वाटणं यांसारख्या मानसिक तक्रारी सुरू होतात- ज्या आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. मग हे सगळं कसं टाळायचं? तर ‘मानस’भान ठेवून, चिंता नाही, चिंतन करायचं आहे.
तुम्ही अतिविचारांच्या भोवऱ्यात अडकता, तेव्हा त्यातून बाहेर पाडण्यासाठी काही गोष्टी नक्कीच करू शकता. पहिलं तर तुमच्या चिंतेला प्रमाणित करा, चिंतन करून त्यावर अंकुश ठेवा,
1) मी करत असलेल्या विचारांनी माझी चिंता दूर होते आहे का वाढते आहे?
2) ते विचार मला शांत होण्यात मदत करत आहेत, का ते मला अजून अस्वस्थ करत आहेत?
3) मी जे विचार आणि कल्पना करत आहे ते सगळं आत्ता या घडीला खरंच घडतं आहे का?
4) मला माझ्या चिंतेचा खरा स्रोत माहिती आहे का?
हे प्रश्न विचारून तुम्ही स्वतःमध्ये एक awareness आणू शकता. ज्यामुळे, विचारांची तुमच्यावरची पकड सुटते आणि तुमचे विचार नियंत्रणात येतात. मग दुसरी पायरी म्हणजे तुमच्या चिंतेचं जे मूळ स्रोत आहे, जी समस्या आहे, त्याचे सकारात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनातून आकलन आणि निराकरण करा.
थोडे आत्मचिंतन, आणि थोडा स्वतःच्या विचारांचा पॅटर्न समजून घ्या. विचारांची अतिशयोक्ती होते आहे का? याकडे देखील बघा. विचार आपल्यावर स्वार होत असतील, टोकाचे विचार मनात येत असतील, तर आपण कुठंतरी विचारांची अतिशयोक्ती करतोय, आणि मग त्याचं रूपांतर अतिचिंतेमध्ये होत आहे हे समजून घ्या.
मी या समस्येबद्दल किंवा समस्यांबद्दल आत्ता वर्तमान परिस्थितीत नक्की काय करू शकते? त्या परिस्थितीवर माझे कितपत नियंत्रण आहे? अशा सकारात्मक आणि विधायक विचारांवर भर द्या. आपण सकारात्मकपणे वर्तमान आणि भविष्यासाठी कार्यरत असतो, तेव्हा आपला भर solution वर असतो, चिंतेवर नाही. हे समजून घ्या.
एखादी गोष्ट नियंत्रणाबाहेरची असेल, तर ते accept करायलाही शिकलं पाहिजे. मग थोडं धैर्य आणि थोडा तटस्थपणाही मी शिकला पाहिजे, हे समजून घ्या.
अशा प्रकारे आपण ‘मानस’भान ठेवून चिंतन करतो, तेव्हां आपण चिंतेपासून चिंतनाचा प्रवास नक्कीच करू शकतो.