Habitual effects on teeth: दातांची योग्य रचना ही अन्न चावण्यासाठी खूप गरजेची आहे. दातांची योग्य रचना व सुंदर हास्य आपण योग्यवेळी दंतव्यंगोपचार करून मिळवू शकतो. वयाच्या सहाव्या वर्षांपासून कायमचे दात उगवतात. दात उगवताना लक्ष ठेवावे. उगवणारा दात सरळ येतोय का वाकडा, दुधाच्या दाताच्या पुढे किंवा मागे येतोय का हे पाहणेही खूप गरजेचे असते. कारण येथूनच सुरवात होते सुंदर हास्य रचनेची.
— डॉ.प्रिया सुहास नागरगोजे, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगरदातांच्या समस्यांचे जर लवकर निदान झाले तर उपचार नेहमी कमी वेदनादायी व सोपे होतात. दुधाचे दात असतानाच जर समस्या उद्भवली तर त्वरित उपचार करून पुढील क्लिष्ट उपचार आपण टाळू शकतो. त्यामुळे याबाबत पालकांनी सजग असले पाहिजे.लहान मुलांच्या विविध सवयी या दातांच्या आजाराचे कारण ठरू शकतात व दंत रचनेवर परिणाम करतात. अनेक बाळ अंगठा चोखतात. बाळ मोठे होत असताना ही सवय बंद होते, मात्र भूक लागल्यावर काही मुलांमध्ये अंगठा चोखण्याची सवय सुरूच राहते. या सवयीमुळे वरचे समोरचे दात पुढे येतात.
वरचा समोरचा जबडा पण जास्त पुढे वाढतो व टाळूचा भाग खोलगट होऊ शकतो. जर मूल पाच वर्षानंतर पण अंगठा चोखत असेल तर दंतवैद्याचा सल्ला घ्यावा. सवय मोडण्यासाठी एक प्लेट दिली जाते (Habit breaking appliance). जीभ टाळूला सतत लावण्याच्या सवयीमुळे (Tongue thrusting Habit) वरच्या समोरील दातांमध्ये फटी पडतात. जीभ ही खालच्या जबड्यात तोंडामध्ये ठेवली जाते. ही सवय पण उपचारानंतर बंद होऊ शकते.
वयाच्या सहाव्या वर्षापासून दुधाचे दात पडायला सुरवात होते. समोरचे खालचे दात सर्वप्रथम पडतात व त्या जागी कायमचे दात येतात. जर दुधाचे दात पडण्याआधी कायमचे दात आले किंवा यायला लागले तर त्वरित दंतवैद्याचा (डेन्टिस्ट) सल्ला घ्यावा. यात दुधाचे दात काढून नवीन येणाऱ्या दाताला जागा निर्माण करून दिली जाते. कायमचे दात वेडेवाकडे , पुढे किंवा मागे उगवले तर लवकर दंतवैद्याचे मार्गदर्शन घ्यावे. वाढत्या वयात जबड्याची वाढ होत असते. त्याला आपण दिशा देऊ शकतो किंवा रुंदी वाढवू शकतो. कायमचे दात दुधाच्या दातांपेक्षा मोठे असतात तेव्हा जबडा रुंद करून दंतरचना नीट केली जाते, असे तज्ज्ञ डॉ.प्रिया नागरगोजे यांनी सांगितले.
एकाच बाजूने जेवणेही जबड्याच्या वाढीवर करते परिणामवय वर्ष ९ ते १३ दरम्यान दातांच्या रचनेतील व्यंग थोड्याशा उपचाराने नैसर्गिक वाढीचा फायदा घेऊन नीट केले जाऊ शकते. पुढे आलेले दात उपदाढा न काढता जबड्याच्या वाढीचा फायदा घेऊन मागे घेऊ शकतो. बऱ्याचदा किडकी दात दुखत असेल तर मूल एकाच बाजूने जेवायला लागते. त्यामुळे जबड्याची दाढ असमतोल होऊ शकते. ही सवय किडक्या दाढेवर वेळीच उपचार करून बंद करता येते, असे तज्ज्ञ डॉ.प्रिया नागरगोजे यांनी सांगितले.