बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील पत्रकार परिषदेतून अजित आगरकर यांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यानुसार रोहित शर्मा हा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण 8 संघ सहभागी झाले आहेत. टीम इंडियाचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाचे साखळी फेरीतील सर्व सामने हे सुरक्षिततेच्या कारणामुळे दुबईत होणार आहेत.
केएल राहुल हा विकेटकीपर म्हणून पहिली पसंती होता. त्यानुसार केएलची निवड करण्यात आली आहे. तर ऋषभ पंतने पर्यायी विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन याच्यावर मात करत संघात स्थान मिळवलं आहे. त्यामुळे यंदाही संजू सॅमसनला डच्चू मिळाला आहे. तसेच संघात श्रेयस अय्यर याचा समावेश करण्यात आला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतून यशस्वी जयस्वाल याची पहिल्यांदाच एकदिवसीय संघात निवड करण्यात आली आहे. यशस्वीचा बॅकअप ओपनर म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यशस्वीला संधी मिळाल्यास त्याचं एकदिवसीय पदार्पण ठरेल. तर दुसऱ्या बाजूला करुण नायर याला निवड समितीने संधी दिलेली नाही. करुणने विजय हजारे ट्रॉफीतील 2024-2025 या हंगामातील 7 सामन्यांमध्ये एकूण 5 शतकांसह 750 पेक्षा अधिक धावा केल्यात. त्यामुळे करुणला संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र निवड समितीने करुणचा विचार केला नाही.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचं आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर टीम इंडियात कमबॅक झालं आहे. शमीची निवड करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला संधी देण्यात आलेली नाही.
जसप्रीत बुमराहचा समावेश केला जाणार की नाही? याबाबत सातत्याने चर्चा पाहायला मिळत होती. बुमराहला ऑस्ट्रेलियात दौऱ्यातील सिडनी कसोटीत पाठीला दुखापत झाली होती. बुमराहला या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावं लागेल, असं म्हटलं जात होतं. मात्र निवड समिताने बुमराहचा समावेश केला आहे. “बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत फिट होईल. मात्र बुमराह खेळणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल”, असं अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात 20 फेब्रुवारीपासून करणार आहे. टीम इंडिया या सामन्यात बांगलादेशविरुद्ध भिडणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला दुसरा सामना होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. या सामन्यात इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहेत. तर रोहितसेना साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 2 मार्चला खेळणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे.
इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 23 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 2 मार्च, दुबई
सेमी फायनल-1, 4 मार्च, दुबई
सेमी फायनल-2, 5 मार्च, लाहोर
फायनल, 9 मार्च, लाहोर, टीम इंडिया पोहचल्यास दुबई
10 मार्च, (अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस)
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.