Donald Trump Swearing-in Ceremony Marathi News : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प आज दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत, त्यानंतर जगातील या सुपरपॉवर असलेल्या देशात नवं ट्रम्प युग सुरु होईल. ट्रम्प यांनी देशाचा कारभार हातात घेतल्यानंतर त्याचे एकूणच जगावर काय परिणाम होतात हे येत्या काळात पाहायला मिळेल. पण तत्पूर्वी आजच्या शपथविधीच्या पूर्वसंध्येला ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसी इथं आयोजित रॅलीमध्ये अमेरिकन जनतेला उद्देशून भाषण केलं. यामध्ये त्यांनी प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे संकेत दिले, यामध्ये महत्वाचं म्हणजे तिसऱ्या महायुद्धाबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
रविवारी संध्याकाळी कॅपिटल वन अरेना इथं मेक अमेरिका ग्रेट अगेन (MAGA) या 'विजय रॅली'त बोलताना ट्रम्प म्हणाले, "आम्ही अमेरिकन नागरिकांना इतिहासात कोणत्याही राष्ट्राध्यक्षाच्या काळात झाला नाही असा कामकाजाचा सर्वोत्तम पहिला दिवस, सर्वात खास पहिला आठवडा आणि अभुतपूर्व असं पहिल्या १०० दिवसांचं कामकाज देणार आहोत" तसंच ओव्हल ऑफिसची सूत्र पुन्हा एकदा ताब्यात घेताना मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतलेले प्रशासकीय निर्णय मागे घेण्याचा मानसही बोलून दाखवला.
ट्रम्प म्हणाले, आमचं प्रशासन लवकरच देशाच्या सीमांवर नियंत्रण पुन्हा स्थापित करेल तसंच अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी घुसखोरांविरोधातील कारवाई सुरू करणार आहोत. पण हजारो बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी काही वर्षे लागू शकतील. आम्ही अमेरिकेच्या भूमीवर सध्या कार्यरत असलेल्या प्रत्येक बेकायदेशीर परदेशी टोळ्यांना आणि स्थलांतरित गुन्हेगारांना हाकलून लावू," असं आश्वासन त्यांनी अमेरिकन जनतेला दिलं.
मेक्सिकोबाबत धोरण
सोमवारी ट्रम्प यांच्या पहिल्या सरकारी आदेशांत सीमा सुरक्षेबाबत महत्वाचे आदेश देण्यात आले. यामध्ये ड्रग्ज कार्टेलना 'विदेशी दहशतवादी संघटना' म्हणून वर्गीकृत करण्यात येणार आहे. अमेरिका-मेक्सिको सीमेवर आणीबाणी जाहीर केली जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यासाठी नवं धोरण आखलं जाणार असून 'मेक्सिकोतच राहा' या नावानं हे धोरण सुरू केलं जाणार आहे.
टिकटॉकचा ५० टक्के हिस्सा आमचा असेल
यावेळी ट्रम्प यांनी टिकटॉकला पुन्हा नवसंजीवनी देण्याचं श्रेय देखील घेतलं. चीनच्या मालकीचा हे व्हिडिओ-शेअरिंग अॅप अमेरिका 'संयुक्त उपक्रम' म्हणून सुरु ठेवेल. आपल्याला टिकटॉक वाचवण्याची गरज आहे कारण आपल्याला खूप नोकऱ्या वाचवायच्या आहेत. आपल्याला आपला व्यवसाय चीनला द्यायचा नाही. त्यामुळं टिकटॉकमध्ये अमेरिकेची ५० टक्के मालकी असेल या अटीवर मी टिकटॉकला मान्यता दिली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मार्टीन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या हत्येची कागदपत्रे उघड करणार
दरम्यान, ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी, माजी अमेरिकन अॅटर्नी जनरल रॉबर्ट एफ केनेडी आणि नागरी हक्कांचे प्रतीक मार्टिन लूथर किंग ज्युनियर यांच्या हत्येशी संबंधित सर्व कागदपत्रे उघड करण्याची आणि प्रसिद्ध करण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
तिसऱ्या महायुद्धाबाबत भाष्य
त्याचबरोबर तिसऱ्या महायुद्धाबाबतही महत्वाचं भाष्य यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. ट्रम्प म्हणाले, तिसरं महायुद्ध रोखण्याची शपथच आपण घेतली आहे. त्यामुळं खरंतर गाझाचं युद्ध थांबवण्यात आमचाच महत्वाचा वाटा आहे. गाझा युद्धविराम कराराचं श्रेय ट्रम्प यांनी घेतलं असून जर आपण अमेरिकेचा अध्यक्ष असतो तर हे युद्ध झालंच नसतं, असं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही मध्य-पूर्वेतील चिरस्थायी शांततेच्या दिशेनं पहिले पाऊल म्हणून एक महाकाय युद्धविराम करार आम्ही करुन दाखवला. हा करार नोव्हेंबरमध्ये झालेल्या आमच्या ऐतिहासिक विजयामुळेच होऊ शकला. त्यानुसार आता पहिल्या ओलिसांची नुकतीच सुटका झाली आहे. जर मी राष्ट्रपती असतो तर गाझा युद्ध कधीच घडलं नसतं, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.