छत्रपती संभाजीनगर : सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींची मोठी साखळी आहे. त्यांचे नेटवर्क खूप स्ट्राँग आहे. विशेष म्हणजे यांच्या वेगवेगळ्या टीम्स असून, खंडणी मागायला लावणारा, आरोपींना गायब करणारा, खून करायला लावणारा आणि त्यांना संभाळणारा मोठा गुन्हेगार अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी रविवारी (ता. १९) केली.
शहरातील दिल्लीगेट परिसरात जाहीर सभेत ते म्हणाले की, खंडणी मागणारे, आरोपींना गायब करणारे, खून करणारे, आरोपींना आसरा देणारे, डाके टाकणारे, छेडछाडी-बलात्कार करणारी वेगळी टीम अशा विविध टीम्स आहेत. इतकेच नव्हे तर या सर्वांना संभाळणारा एक जण आहे.
त्याला अगोदर जेलमध्ये टाका. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी समाजबांधवांना शब्द दिल्याने समाज शांत आहे, आरोपींपैकी एक जरी सुटला तरी सामना आमच्यासोबत आहे, हे विसरू नका. नाही तर एक दिवस राज्य बंद पाडू, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.
म्हणून धनंजय मुंडेंचे नावजरांगे म्हणाले, धनंजय मुंडेंच्या टोळ्या मोर्चे काढत आहेत. मुंडेंनी त्यांना रोखले नाही, तर पुढची संकटे टाळण्यासाठी मुंडेंच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत.
आजवर मुंडेंचे नाव आपण घेत नव्हतो, पण ज्या दिवशी धनंजय देशमुख यांना पोलिस ठाण्यात जाऊन धमकी देण्यात आली, २६ दिवसांनंतरही त्यांनी त्यांची लोकं शांत केली नाही, म्हणून आपण त्यांचे नाव घ्यायला सुरवात केली.