केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाची आंदोलकांशी चर्चा : उपोषणकर्ते डल्लेवाल यांची उपचारांना साथ
वृत्तसंस्था/ चंदीगड, नवी दिल्ली
शेतकरी आंदोलनाबाबत शनिवारी रात्री केंद्र सरकारच्या एका शिष्टमंडळाने खानौरीला भेट दिल्यानंतर रात्री उशिरापर्यंत येथे बैठकांचा सिलसिला सुरू होता. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत 14 फेब्रुवारी रोजी चंदीगडमध्ये बैठक होणार आहे. शनिवारी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव प्रियरंजन खानौरी सीमेवर पोहोचले. येथे त्यांनी आमरण उपोषण करणारे शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर डल्लेवाल वैद्यकीय सुविधा घेण्यास राजी झाल्यानंतर त्यांना ग्लुकोज देण्यात आले.
सर्व पिकांना किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) खरेदी करण्यासह 12 मागण्यांसाठी पंजाब-हरियाणा राज्याच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आंदोलकांना भेटण्यासाठी शनिवारी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव पंजाब आणि हरियाणाच्या खानौरी सीमेवर पोहोचले होते. शेतकऱ्यांच्या संमतीनंतर केंद्र सरकारने रात्री उशिरा बैठकीबाबत पत्रही जारी केले. पत्रानुसार, भारतीय किसान युनियन (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या मागण्यांबाबत भारत सरकार आणि पंजाब सरकारच्या मंत्र्यांची बैठक 14 फेब्रुवारी रोजी महात्मा गांधी राज्य सार्वजनिक प्रशासन संस्थेत होणार आहे.
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाने शेतकरी आंदोलक प्रतिनिधींसोबतच उपोषणकर्ते डल्लेवाल यांचीही भेट घेतली. केंद्रीय अधिकाऱ्यांनी डल्लेवाल यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते, परंतु त्यांनी नकार दिला. याचदरम्यान 55 दिवसांपासून उपोषणावर असलेले 70 वर्षीय शेतकरी नेते जगजीतसिंग डल्लेवाल यांना रविवारी ग्लुकोज देण्यात आले. डल्लेवाल यांनी 54 दिवसांचे उपोषण पूर्ण केल्यानंतर शनिवारी रात्री 1 वाजता त्यांच्यावर उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी त्याला ग्लुकोज ड्रिपवर ठेवले. रविवारी डल्लेवाल यांच्या उपोषणाचा 55 वा दिवस सुरू झाला.