मुलींसाठी खेळ आणि व्यायामाचा फायदा
esakal January 21, 2025 12:45 PM

महेंद्र गोखले - फिटनेसविषयक प्रशिक्षक

आपल्या धावपळीच्या जगात, जिथे किशोरवयीन मुलींमध्ये स्क्रीन बघणे आणि बैठी जीवनशैली रूढ झाली आहे, शारीरिक व्यायाम मागे पडत चालला आहे. तथापि, पालक या नात्याने, आपल्या किशोरवयीन मुलींना प्रौढावस्थेत जाताना त्याचा आनंद, आरोग्य आणि प्रकृती उत्तम असले पाहिजे अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे.

स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंग अशी आकर्षणे स्वतःकडे लक्ष वेधत असताना शारीरिक व्यायाम आणि आरोग्य याकडे दुर्लक्ष होते. या बदलामुळे आजच्या तरुणीच्या एकूण फिटनेसच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे त्यांच्या दीर्घकालीन आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.

पालक या नात्याने, याचे गांभीर्य ओळखणे आणि त्या परिस्थितीमधून मुलींना बाहेर काढणे हे आव्हानात्मक झाले आहे. आज आपण किशोरवयीन मुलींसाठी व्यायामाच्या फायद्यांबद्दल सविस्तर आणि शास्त्रीय माहिती मिळवू. ज्यामुळे आपल्याला आपल्या मुलींना आम्हाला निरोगी राहण्यासाठी आवश्यक अशा सवयींबद्दल मार्गदर्शन करता येईल.

खेळ आणि फिटनेससारख्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतल्याने शारीरिक आरोग्याचा मजबूत पाया तयार होतो, आपण यश मिळवू शकतो हा आत्मविश्वास मुलींमध्ये निर्माण होतो आणि त्याचा फायदा त्यांना आयुष्यामधील आव्हाने पेलण्यासाठीही होतो. मी पालकांना त्यांच्या मुलींना स्पर्धात्मक खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा आग्रह करेन- कारण भारतातील महिला खेळाडूंना खूप चांगले भविष्य आहे. खूप कमी मुली वयाच्या सोळा वर्षांनंतर स्पर्धात्मक खेळ खेळणे सुरू ठेवतात; परंतु मला असे वाटते, की त्यांच्या सर्वांची ही सर्वांत मोठी चूक आहे.

किशोरवयीन मुलींना व्यायाम आणि खेळ यांचा कसा फायदा होतो, हे बघूया.

शारीरिक आरोग्य

व्यायामामुळे कॅलरी बर्न होतात, कमकुवत स्नायूंच्या विकासाला चालना मिळते आणि निरोगी बॉडी मास इंडेक्स (BMI) राखण्यात मदत होते. याव्यतिरिक्त, ताकद, सहनशक्ती यांसारख्या वजन सहन करण्याच्या ॲक्टिव्हिटीज केल्याने हाडांची घनता वाढू शकते, जे विशेषतः पौगंडावस्थेतील हाडांचे कमाल मास प्राप्त केले जाते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका टाळता येतो. नियमित शारीरिक व्यायामामुळे हार्मोनल समस्यांची लक्षणे कमी होऊ शकतात आणि मासिक पाळीचे नियमन करू शकतात.

मानसिक आरोग्य

निरोगी शरीर राखण्यासाठी शारीरिक हालचाली आवश्यक आहेत हे खरे असले, तरी निरोगी मन राखण्यासाठी ते तितकेच महत्त्वाचे आहे. खेळ आणि व्यायामामुळे आपल्या शरीरातील नैसर्गिक मूड लिफ्टर्सचे - एन्डॉर्फिनचे वहन सुरू होते - जे चिंता आणि नैराश्याच्या भावना दूर करू शकतात.

याव्यतिरिक्त, फिटनेसचे ध्येय गाठल्यामुळे निर्माण होणारा आत्मविश्वास आणि स्वतःबद्दलची सकारात्मक प्रतिमा याच मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते. हे थेट, सकारात्मक विचारसरणी आत्मसात करण्याचे गमक आहे. व्यायामामुळे मानसिक आरोग्य सुधारते, ज्यामुळे व्यक्ती अधिक व्यायाम करण्यास प्रवृत्त होते. नेतृत्व कौशल्य सुधारण्यास मदत होते.

शैक्षणिक कामगिरी

शारीरिक हालचालींमुळे केवळ आपल्या मनाला बरे वाटते असे नव्हे, तर आपल्या मनाची विचार करण्याची क्षमताही वाढते. कोणताही खेळ खेळण्यासाठी प्रथम तुम्ही हुशार असणे आवश्यक आहे. बऱ्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे, की नियमित व्यायामामुळे स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करणे, आणि मानसिक लवचिकता यासारख्या क्षेत्रांमध्ये कार्यक्षमता वाढू शकते. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या शैक्षणिक आयुष्यात देखील बघायला मिळतो.

तणाव कमी करणे

किशोरावस्था हा शाळेतील दबाव, समवयस्क नातेसंबंध आणि प्रौढत्वाच्या मार्गावर नॅव्हिगेट विचारसरणी निर्माण होऊ शकणारा तणावाचा काळ असतो. नियमित खेळ आणि शारीरिक ॲक्टिव्हिटीज अशा तणावासाठी एक निरोगी आउटलेट निर्माण करतात, किंवा नकारात्मक भावनांना आपल्या मनामध्ये थारा देत नाहीत.

तणाव आणि चिंता यापासून नैसर्गिकरित्या दूर राहण्याची क्षमता निर्माण करतात. व्यायामादरम्यान एंडोर्फिनचे वहन शांत आणि निरोगीपणाची भावना निर्माण करू शकते, किशोरांना तणावपूर्ण परिस्थितीत अधिक प्रभावीपणे बाहेर पडण्यास मदत करते.

आत्मविश्वास

फिटनेसची उद्दिष्टे साध्य करणे किंवा एखाद्या खेळात उत्कृष्ट कामगिरी केल्याने किशोरवयीन मुलींमध्ये आत्मसन्मान आणि स्वप्रतिमा वाढण्यास मदत होते. मुलींना व्यायामासाठी प्रोत्साहित करणे हे आत्मविश्वास वाढवण्याच्या दिशेने एक पाऊल असू शकते. शिवाय, नियमित शारीरिक हालचालींमुळे शरीराची प्रतिमा सुधारू शकते- कारण या वयात त्या सशक्त, निरोगी आणि शरीरावर ताबा असलेल्या व्यक्ती आहेत असे वाटते.

वैयक्तिक आणि सांघिक उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी आणि ती साध्य करण्यासाठी या सगळ्या क्षमता युवकांना प्रेरक ठरतात. त्यांना वाजवी धोका पत्करून, चुकांमधून शिकण्यास आणि त्यातून आपला विकास घडवणे शिकवतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.