केमोथेरपी : भीतीपेक्षा माहिती महत्त्वाची
esakal January 21, 2025 12:45 PM

आशा नेगी

‘कॅन्सर’ हा शब्द ऐकला, की पहिल्यांदा आपल्या मनात येणारा विचार म्हणजे ‘केमोथेरपी.’ केमोथेरेपीची सर्वसामान्य लोकांमध्ये मोठी भीती आहे. कॅन्सर या आजारापेक्षा लोकांना केमोथेरपीची जास्त भीती असते. मला कॅन्सर होण्याच्या आधी मीही याच यादीमध्ये येत होते. या प्रक्रियेबाबत गैरसमजच जास्त असते. त्यामुळे त्यांच्याबाबत माझ्या अनुभवांतून काही माहिती मला द्यावीशी वाटते, अर्थात या उपचारांना सामोरे जाणाऱ्या रुग्णांनी, कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी तज्ज्ञांकडून नक्की माहिती घ्यावी. फक्त भीती टाळण्यासाठी काही गोष्टी मी नक्की सांगेन.

‘केमो’ म्हणजे नक्की काय?

केमोथेरपी हा कॅन्सरवर उपचार करण्याचा एक महत्त्वाचा आणि सामान्यतः वापरला जाणारा मार्ग आहे. यामध्ये सलाईनद्वारे औषधांचा वापर करून कॅन्सरवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु याच उपचारामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. केमोथेरपीबाबत सर्वसामान्यांमध्ये एक प्रकारची भीती असते, परंतु ती सध्या वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत प्रगत आणि नियंत्रित पद्धतीने केली जाते. योग्य आहार, मानसिक तयारी, आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा प्रवास अधिक सोपा होतो.

केमोथेरपी म्हणजे काय?

केमोथेरपी ही एक औषधांच्या माध्यमातून दिली जाणारी उपचार पद्धती आहे. या औषधांचा उद्देश कॅन्सरच्या पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांना नष्ट करणे आहे.

लोकांचे गैरसमज

  • केमोथेरपी म्हणजे शेवटचा उपाय आहे : बऱ्याच लोकांना वाटतं, की केमोथेरपी दिली जाते म्हणजे रुग्णाची स्थिती गंभीर आहे. प्रत्यक्षात, कॅन्सरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केमोथेरपीचा उपयोग केला जातो, अगदी सुरुवातीच्या अवस्थेतसुद्धा.

  • केमोथेरपी खूप वेदनादायक असते : लोकांना वाटतं, की केमोथेरपीमुळे कायम वेदना आणि थकवा होतो. प्रत्यक्षात, दुष्परिणाम कमी करण्यासाठी सध्या अनेक प्रगत औषधं उपलब्ध आहेत. मी माझ्या केमो एकट्या जाऊन घेतल्या आहेत. केमोमुळे फक्त वीकनेस येतो. तो तर सर्वसाधारण तापामध्येही येतोच. त्यामुळे लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. मन आनंदी ठेवा, डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पाणी पाळा, तुम्हाला त्रास होणार नाही असा सकारात्मक विचार करा.

  • केमोथेरपीमध्ये पूर्ण शरीराची आग होते : बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो, की केमो घेतली तर पूर्ण शरीराची आग होते. असे काहीही होत नाही. बरेचसे कॅन्सर पेशंट केमो घेऊन कामालाही जातात.

  • केमोथेरपीमुळे रुग्णाचे आयुष्य कमी होते : उलट, केमोथेरपीने कॅन्सरच्या पेशींवर नियंत्रण मिळवता येतं आणि रुग्णाला दीर्घायुष्य दिलं जाऊ शकतं. सन २०२३ मध्ये मी सहा केमो घेतल्या. माझा फिटनेस कॅन्सरच्या आधी जसा होता तसाच आताही आहे.

  • प्रत्येक कॅन्सरमध्ये केमोथेरपी गरजेची असते : केमोथेरपी हा एक पर्याय आहे; पण सर्व कॅन्सरसाठी हा उपयोगी असेलच असं नाही. शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, इम्युनोथेरपीसारख्या इतर उपचार पद्धतीदेखील वापरल्या जातात.

  • कॅन्सर पेशंट बऱ्याचदा ट्रीटमेंट घेत असताना, टेन्शन, प्रेशरमध्ये येऊन त्यांचं सर्वसामान्य जीवन जगणं सोडून येतात, तसं न करता आपण आपलं ‘डेली रूटिन’ तसंच ठेवलं, आपलं मन एखाद्या गोष्टींमध्ये गुंतवलं, तर हा प्रवास सोपा होतो. शेवटी आयुष्यात तुमचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. सकारात्मक विचारच तुम्हाला या गोष्टीतून बाहेर पडण्यास मदत करतात. मी या आजारातून बाहेर पडणारच, असा ठाम विश्वास आपण ठेवला तर अशक्य असं काहीच नाही.

  • मला थर्ड स्टेजचा अग्रेसिव्ह ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. मी माझा दिनक्रम कधीच बदला नाही. शक्य तेवढं स्वतःला मी कामात गुंतवलं, मी याच्यातून बाहेर पडणारच असं माझ्या मनालाही ठामपणे बजावलं. कारण कोणताही आजार फक्त शारीरिक नसतो, तो मानसिकही असतो आणि मानसिकरित्या तुम्ही स्ट्रॉंग असाल, तर कोणत्याही अडचणीतून तुम्ही बाहेर पडू शकता.

  • आज मी या प्रवासातून यशस्वीपणे बाहेर पडले आहे. माझ्या अनुभवातून मी एकच शिकले : कोणताही आजार मोठा नसतो, जर तुमची इच्छाशक्ती आणि मानसिक स्थैर्य मोठं असेल. सकारात्मक विचार आणि मानसिक तयारी यामुळे कोणत्याही अडचणीतून बाहेर पडता येते.

  • माझ्या कॅन्सरच्या प्रवासातून एक शिकले : कोणत्याही कठीण काळाचा सामना करण्यासाठी तुमचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. मनाची ताकद हेच तुमचं खरं बळ आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.