सुंदर दिसण्याच्या मागे प्रत्येक व्यक्ती धावते. यामध्ये महिला त्यांच्या सौंदर्याची अधिक काळजी घेताना दिसतात. केस धुण्यासाठी किंवा स्टायलिंगसाठी ब्युटी पार्लरमध्ये जाणे हे आजच्या काळात सामान्य झाले आहे. मात्र, सौंदर्यासाठी पार्लरमध्ये जाणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.एका महत्त्वपूर्ण अभ्यासात असे समोर आले आहे की पार्लरमध्ये केस धुण्यासाठी विशेषतः शॅम्पूच्या वेळेस डोक्याची पोजिशन चुकीची असल्याने महिलांना “ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम” होऊ शकतो. यामुळे 50 वर्षांपुढील महिलांमध्ये स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
istockphoto
ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हणजे काय?“ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम” हा एक आरोग्यदृष्ट्या गंभीर परिणाम आहे, जो केस धुण्याच्या वेळी चुकीच्या पद्धतीने मान व डोकं टेकवले गेल्यामुळे होतो. पार्लरमध्ये अनेक वेळा बेसिनसमोर मान पूर्णपणे मागे झुकवून ठेवावी लागते. ही पोजिशन मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांवर दबाव आणते. परिणामी, रक्तप्रवाह बाधित होतो आणि त्यामुळे स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो.
संशोधन काय सांगते?
एका वैद्यकीय अहवालानुसार, अशी पद्धत 50 वर्षांहून जास्त वयाच्या महिलांसाठी अधिक घातक ठरते, कारण वय वाढल्यामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात. अशा स्थितीत बेसिनसमोर मान झुकवणे किंवा मागे झुकवणे रक्तप्रवाहावर परिणाम करू शकते. काही वेळा यामुळे चक्कर येणे, डोकं हलकं होणे किंवा स्ट्रोकसारखी लक्षणे दिसू शकतात.
स्ट्रोकची लक्षणे
- अचानक चक्कर येणे
- डोकेदुखी
- बधिरपणा किंवा शरीराचा काही भाग हालवण्यात त्रास
- अस्पष्ट बोलणे
- दुहेरी दिसणे
सावधगिरीचा उपाय1. योग्य पोझिशनचा आग्रह धरा:पार्लरमध्ये केस धुण्याच्या वेळी मान व डोक्याची पोझिशन योग्य आहे याची खात्री करा. मान पूर्णपणे मागे झुकवू नका.
2. घरच्या घरी केस धुण्याला प्राधान्य द्या: शक्य असल्यास केस धुण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याऐवजी घरीच योग्य पद्धतीने केस धुवा.
3. मसाज दरम्यान काळजी घ्या: मसाज करताना मान किंवा डोक्यावर खूप जोर लावला जात नाही याची खबरदारी घ्या.
4. वैद्यकीय सल्ला घ्या: कोणतीही समस्या जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा :PCOS असलेल्या महिलांना वजन कमी करणे का कठीण होते? जाणून घ्या कारणे व उपाय
सौंदर्यासोबत आरोग्य जपणं महत्त्वाचंसौंदर्य राखण्यासाठी पार्लरमध्ये जाणं चुकीचं नाही, मात्र त्यासाठी आरोग्याशी तडजोड करणं धोकादायक ठरू शकतं. सौंदर्य आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जाव्यात यासाठी महिलांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीने सौंदर्य उपचार घेतल्यास आपण आरोग्यसुद्धा सुरक्षित ठेवू शकतो. या छोट्या सावधगिरीमुळे तुम्ही “ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम” टाळू शकता आणि तुमचं आरोग्य टिकवून ठेवू शकता. सौंदर्यसाठी आरोग्याशी कधीही तडजोड करू नका.