मुंबई (प्रेमानंद बच्छाव) : अजित पवार कुठे दिसले नाही की नॉट रिचेबल, अजितदादा कुठे गेले अशा बातम्या सुरू होतात. आम्हाला आमच्याबाबतच माहिती नसलेल्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येतात आणि मीडिया ट्रायल करण्यात येते. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असेल तरीही मीडिया ट्रायल होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता. 21 जानेवारी) प्रसार माध्यमांच्या सनसनाटीपणावर नाराजी व्यक्त केली. एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी. बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी माध्यमांकडून जबाबदार आणि विश्वासार्ह वार्तांकनची अपेक्षा व्यक्त केली. (Ajit Pawar expressed personal displeasure on media trial from reliable sources)
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, माझ्यावर तर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्या प्रकरणात मी खूप भोगले आहे. आतापर्यंत त्या आरोपांच्या चौकशा सुरू होत्या. त्यामुळे ही नेमकी सूत्रे कोण असतात? ते मी पत्रकारांकडून जाणून घेणार आहे. या सूत्रांना देखील एखादा जीवनगौरव पुरस्कार द्यायला हरकत नाही, अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी यावेळी केली. माध्यम क्षेत्रात बदल होत असताना मीडिया ट्रायल सारखी आव्हानेही समोर येत आहेत. ‘मीडिया ट्रायल’मुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि एखाद्या व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते आणि एखाद्याचे करिअर संपू शकते. माध्यमांनी सत्य, पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व द्यावे. चुकीच्या गोष्टीवर टीका करणे, टीप्पणी करणे हा माध्यमांचा हक्क आहे. सगळीकडे नकारात्मक गोष्टी घडताना चांगल्या, सकारात्मक गोष्टी सुद्धा समाजाच्या समोर येणे आवश्यक असल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा… Sushma Andhare : सावध आणि सतर्क राहा, सुषमा अंधारेंचा नव्या राज्य निवडणूक आयुक्तांना सल्ला
अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात घडलेला किस्साही त्यांनी कार्यक्रमात सांगितला. बारामती येथे कृषी प्रदर्शन होते. पंकजा मुंडे, माणिकराव कोकाटे देखील माझ्यासोबत होते. आम्ही सकाळी सात वाजता प्रदर्शनाला गेलो. तिथे लगेचच माध्यमांनी सैफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत माझी प्रतिक्रिया विचारली. हल्ला कुठे झाला?, कसा झाला? याची काहीच कल्पना मला नव्हती. त्यानंतर विरोधकांनी लगेच मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे आरोप सुरू केले, असे यावेळी अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 तारखेला होती. सकाळी मतमोजणी सुरू झाली, तेव्हा बातमी चालली की अजित पवार पोस्टल बॅलटमध्ये पिछाडीवर आहेत. हे ऐकल्यानंतर माझी आई तणावात आली. तिने बिचारीने देवाचा धावा सुरू केला. मी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तेव्हा त्यांनी तसे काहीच नाही, असे सांगितले. नंतर मी संबंधित वृत्तवाहिनीला फोन केला. तेव्हा त्यांनी सांगितले की, दादा आम्हाला असे म्हणावे लागते. त्यामुळे आमचा टीआरपी वाढतो. परंतु, असे करणे योग्य नाही, असे सांगत अजित पवार यांनी वृत्तवाहिन्यांच्या बातमीदारीच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.