छत्रपती संभाजीनगर : परळी वैजनाथ येथील राखेचा काळाबाजार व शासन नियमांची पायमल्ली करत सुरू असलेली अवैध आणि असुरक्षित वाहतूक औष्णिक विद्युत केंद्र परिसरातील शेती उद्ध्वस्त करणारी ठरत आहे. ठिकठिकाणी पडलेले ढिगारे आणि उघड्या टिप्परमधील राख उडून शिवारात पसरते. परिणामी जमिनीची गुणवत्ता बिघडते आणि शेतीची शाश्वतता धोक्यात येते. यामुळे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या तक्रारींना आजपर्यंत केराची टोपली दाखविण्याचेच काम यंत्रणेने केले आहे.
परळी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या १० ते १५ किमी परिघात असलेल्या गावांतील ग्रामस्थांना ज्या पद्धतीने राख वाहतुकीमुळे आरोग्याच्या व वाढत्या अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागते आहे, अगदी त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनाही. शेतशिवारात पसरणाऱ्या राखेमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असून पिकांची वाढ खुंटणे, शेतीचा पोत घसरणे असे प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहेत.
यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेला खर्चही निघायला तयार नाही. शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत चालले आहे. खर्च करून, मशागत करून पुरेसे उत्पादन होत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे बंद करून इतर व्यवसाय किंवा कामे करणे सुरू केले आहे. यासाठी औष्णिक विद्युत निर्मिती प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात...असे आहेत दीर्घकालीन परिणाम
कोळशाच्या राखेमुळे जमिनीची गुणवत्ता बिघडते. जमिनीतील पाणी धारकता आणि एकत्रिकरण सुधारत नाही. जमिनीचा पोत बिघडतो, शेतीची शाश्वतता धोक्यात येते. जमिनीवर आणि पृष्ठभागाच्या पाण्यात जड धातू विरघळतात. त्यामुळे मातीची अनेक नैसर्गिक वैशिष्ट्ये बदलतात किंवा नष्ट होतात. त्याची जैवविविधता आणि शेतीसाठी उत्पादकता कमी होते.
राखेतील पोषकतत्त्वांचे प्रमाण संतुलित नसेल तर पिकांना इतर खतांची पूर्तता करण्याची आवश्यकता भासते. कोळशाच्या राखेतील काही रासायनिक घटक मातीतील जैविक जीवाणूंच्या क्रियाकलापांवर प्रतिकूल परिणाम करू शकतात, ज्यामुळे मातीची सुपीकता घटते. मातीची रचना पल्व्हरायझेशन किंवा एकूण बिघाडामुळे विस्कळित होऊ शकते.
जमिनीचा पोत बदलणे
कोळशाच्या राखेत असलेले रासायनिक घटक, जसे की सिलिका, ॲल्युमिना आणि सायट्रस, जमिनीचा पोत खराब करतात. यामुळे जमिनीची पाणी धारण करण्याची आणि हवा आदान-प्रदान करण्याची क्षमता कमी होते. याशिवाय राखेत सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारख्या क्षारयुक्त घटकांचा समावेश असतो. त्यामुळे जमिनीत खारटपणा वाढतो अन् मातीची फलोत्पादन क्षमता कमी होऊ शकते.
पिकांच्या वाढीवर परिणाम
ज्या जमिनीत कोळशाची राख जास्त प्रमाणात असते, त्यामध्ये पिकांची वाढ खंडित होऊ शकते. राखेमुळे पिकांना आवश्यक असलेले खनिज आणि पोषणतत्त्व व्यवस्थित पोचू शकत नाहीत. ज्यामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन प्रभावित होऊ शकते. माती खूप अल्कधर्मी होऊ शकते. ज्यामुळे काही पिकांची वाढ मर्यादित होते. राखेतील विषारी तत्त्व (जसे, भारी धातू) असतील तर ते माती व पिकांसाठी हानिकारक ठरू शकते.
जैविक सक्रियतेवर परिणाम
कोळशाच्या राखेत असलेले रासायनिक घटक, मातीतील सूक्ष्मजीवांच्या सक्रियतेवर प्रतिकूल परिणाम करू शकतात. हे मातीतील जैविक प्रक्रिया मंदावू शकते. राख हलकी असल्याने ती मातीची पाणी धारण क्षमता कमी करू शकते.