टाकळीभान : विवाह समारंभ आटोपून प्रवरा संगमवरून टाकळीभानला परतत असताना जीप व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वारासह तीनजण ठार झाले, सहाजण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगरला पाठविण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर टाकळीभान शिवारात ही घटना घडली.
उपचारादरम्यान दुचाकीस्वार दिगंबर शिंदे व जीपमधील गोपिका दिलीपराव जाधवराव, देवयानी दिलीपराव जाधवराव यांचा मृत्यू झाला, तसेच उज्ज्वला सुशील इंगळे (वय ६१), जनार्दन जाधवराव (वय ६०), प्रकाश हनुमंतराव धुमाळ (वय ६०), सुप्रिया प्रकाश धुमाळ (वय ४९) यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात,
तर सुशील हरिश्चंद्र इंगळे (वय ६३), दिलीप जाधवराव (वय ६०) यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आल्याची माहिती साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, टाकळीभान येथील प्रगतिशिल शेतकरी शिवाजीराव धुमाळ यांच्या मुलाचा विवाह प्रवरासंगम येथे होता. विवाह सभारंभ आटोपल्यानंतर वऱ्हाडीमंडळी टाकळीभानकडे परतत होती.
त्यातील जीप (एमएच १७ क्यू १७९५) ही टाकळीभान-श्रीरामपूर रस्त्यावर टाकळीभान शिवारातील स्वस्तिक ट्रेंडिंग या दुकानासमोर आली असता दुचाकीवरून (एमएच १७ डीबी ९७०७) जाणारे दिगंबर पांडुरंग शिंदे (वय ६५, रा. गुजरवाडी, ता.श्रीरामपूर) हे अचानक समोर आल्याने त्यांना वाचविताना जीपवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. जीप बाजूच्या कडुनिंबाच्या झाडाला घासली व तिचा पत्रा उचकटून अपघात झाला.