मुंबई – शिवसेना शिंदे गटात सध्या पालकमंत्रीपदावरुन अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ते त्यांच्या दरे गावी गेले असे म्हटले गेले. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना बाजूला करुन शिवसेनेत नवीन नेतृत्वाचा उदय करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा विरोधी पक्षातील दोन नेत्यांनी केला होता. उदय समांत हे 20 आमदारांना घेऊन भाजपात जाऊ शकतात असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवरा म्हणाले. त्यांच्या या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत दावोसमध्ये असलेले उद्योगमंत्री उदय समांत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या 15 दिवसांत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्री सामंत यांनी शिंदेंना भेटायला आलेल्या आमदार खासदारांचा आकडाच सांगितला आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले लवकरच राज्यात राजकीय भूकंप होणार आहे. शिवेसना ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदारांनी मागील 15 दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. काँग्रेसचे नेतेही यात मागे नाहीत. काँग्रेसचे पाच आमदार एकनाथ शिंदेंना भेटून गेले, असा दावा उदय सामंत यांनी केला. पुढील तीन महिन्यात ठाकरे गटाचे 10 माजी आमदार आणि काही जिल्हाप्रमुख हे शिंदे गटात प्रवेश करतील, काँग्रेसचे माजी आमदार-खासदारही शिवसेनेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांनी केलेल्या दाव्यावर उदय सामंत म्हणाले, ज्या पक्षाचा अस्त झाला. त्या पक्षाच्या लोकांनी स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला. जे आमदार आणि खासदार गेल्या पंधरा दिवसांत शिंदेंना भेटले आहेत त्यांना थांबवण्याचा आता त्यांनी प्रयत्न करावा, असा टोलाही सामंत यांनी राऊतांना लगावला.
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी खासदार राहुल शेवाळे यांनी येत्या 23 जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होण्याचा दावा सोमवारीच केला. ते म्हणाले की, “येत्या 23 जानेवारीला एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपल्या पक्षातील आमदारांना टिकवण्यासाठी अशा बातम्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत पसरवत आहेत. काँग्रेसचे काही आमदार आणि ठाकरे गटाचे काही आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांची संख्या जवळपास 10 ते 15 अशी आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात कुठेतरी फूट पडू शकते. दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वत:च्या अस्ताची काळजी त्यांनी घेतली पाहिजे”, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले.
हेही वाचा : Uday Samant : आमच्यात वाद निर्माण करू नका, उदय सामंतांचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर