टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 2025 या वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा पहिल्या टी 20I सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 133 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 3 विकेट्स गमावून 12.5 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. अभिषेक शर्मा हा टीम इंडियाच्या विजयाचा नायक ठरला. अभिषेकने 79 धावांची वादळी खेळी केली. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने या विजयासह इंग्लंडने 2011 साली केलेल्या पराभवाचाही वचपा काढला.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला 41 धावांची आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने पाचव्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावल्या. संजू सॅमसन 26 धावा करुन माघारी परतला. तर कॅप्टन सूर्यकुमार यादव याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाची 2 बाद 41 अशी स्थिती झाली. त्यानंतर अभिषेक आणि तिलक वर्मा या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला. तिलकने अधिकाअधिक अभिषेकला संधी दिली. अभिषेकने टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली. अभिषेकने 20 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. अभिषेकला नाबाद परतण्याची संधी होती. मात्र अभिषेक फटकेबाजीत आऊट झाला. मात्र तोवर टीम इंडियाने विजयाच्या उंबरठ्यावर पोहचली होती.
अभिषेक शर्मा याने 34 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 5 फोरसह 79 रन्स केल्या. अभिषेक आऊट झाल्यानंतर तिलक आणि हार्दिक पंड्या या दोघांनी टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. तिलकने नाबाद 19 धावा केल्या. तर हार्दिकने 3 धावांचं योगदान दिलं. तर इंग्लंडकडून गस एटकीन्सन याने दोघांना बाद केलं. तर आदिल राशिदने 1 विकेट मिळवली.
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकला आणि इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंडियाच्या बॉलिंगसमोर इंग्लंडचे बॅट्समन ढेर झाले. मात्र कॅप्टन जोस बटलर याने 68 धावांची खेळी केली आणि इंग्लंडची लाज राखली. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 132 धावा केल्या. टीम इंडियासाठी वरुण चक्रवर्थी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
युवा ब्रिगेडची विजयी सलामी
दरम्यान टीम इंडियाने या विजायसह इंग्लंडविरुद्धच्या 2011 सालमधील पराभवाचा वचपा काढला. टीम इंडियाने ईडन गार्डनमधील पहिलावहिला टी 20i सामना हा इंग्लंड विरुद्ध खेळला होता. इंग्लंडने तेव्हा भारताला पराभूत केलं होतं. मात्र आता टीम इंडियाने तब्बल 14 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या पराभवाचा वचपा काढला आहे.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.