नवी दिल्ली : जळगावातील पाचोरा येथे काही प्रवाशांना बंगळूरू एक्स्प्रेसने उडवल्याची माहिती समोर आली आहे. परांडा रेल्वे स्थानकांच्या आधी काही कारणास्तव पुष्पक रेल्वे थांबली होती. याचवेळी एसी कोचच्या प्रवाशांमध्ये आग लागल्याची बातमी पसरली. ज्यानंतर भीतीने काही प्रवाशांनी पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या घेतल्या. पण याचवेळी समोरील रेल्वे ट्र्रॅकवरून जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने त्या प्रवाशांना धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दखल घेण्यात आली असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. (Amit Shah expresses grief over Jalgaon railway accident)
अमित शहा यांनी ट्वीट करताना म्हटले की, महाराष्ट्रातील जळगाव येथे घडलेला रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली आहे. स्थानिक प्रशासन जखमींना शक्य ती सर्व मदत पोहोचवत आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.अमित शहा यांच्याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत दुर्घटनेवर भाष्य केले आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी ट्वीट करत म्हटले की, जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे पारधाडे रेल्वे स्थानकानजीक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मी या अपघाताची माहिती घेतली. जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री गिरीश महाजन स्वत: घटनास्थळी पोहोचले असून जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांसह जिल्हा यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य राबवत आहेत. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे यंत्रणा समन्वयाने बचाव व मदतकार्य करीत आहेत. मदतकार्य रात्रीही सुरू राहणार आहे. त्यासाठी ग्लासकटर, फ्लडलाईट्सह आवश्यक यंत्रणा अपघातस्थळी पोहोचली आहे.