येणारा 28 फेब्रुवारीचा दिवस खगोलप्रेमींसाठी एक पर्वणीच असणार आहे. कारण या दिवशी आपल्या सूर्यमालेतील तब्बल 7 ग्रह एकाच रेषेत एका मागोमाग येऊन थांबणार आहेत. आता एकाच रेषेत आल्यामुळे आपल्या सूर्यमालेतील 6 ग्रह मागच्या काही दिवसांपासून रात्री आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत आहेत.
मर्क्युरी हा सातवा ग्रह सुद्धा फिरत आता लवकरच याच रेषेत येणार असल्यामुळे एकाच वेळी सात ग्रह एकापोठोपाठ एकाच रेषेत येण्याचा दुर्मिळ योग खगोल रसिकांना 28 फेब्रुवारीच्या रात्री अनुभवायला मिळणार आहे.
असं असलं तरी ही फक्त अवकाश रसिकांच्या डोळ्यांना सुखावणारी घटना असणार नाही. अशा पद्धतीनं 7 ग्रह एका रेषेत येण्याच्या घटनेचे पडसाद आपल्या सूर्यमालेवरही पडणार आहेत. या दुर्मिळ योगामुळं खगोलतज्ज्ञांना आपल्या सूर्यमालेबद्दल नवी माहिती प्राप्त करण्याची देखील संधी मिळणार आहे.
आपल्या सूर्यमालेतील 8 प्रमुख ग्रह हे एकाच प्रतलात वेगवेगळ्या गतीनं सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. बुध ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. तो फक्त 88 दिवसांमध्ये सूर्याभोवतीची आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे बुध ग्रहावरील एक वर्ष 88 दिवसांचा असतो, असं जाणकार सांगतात.
पृथ्वीला सूर्याभोवतीची आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 365 दिवस लागतात. त्यामुळे पृथ्वीवरील एक वर्ष 365 दिवसांचे असते.
सूर्यापासून ग्रह जसजसा लांब जाईल तसतसा सूर्याभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण करायला त्याला जास्त वेळ लागेल. त्यामुळेच सूर्यापासून सर्वात लांब असलेल्या आपल्या सूर्यमालेतील नेपच्यून या ग्रहाला सूर्याभोवतीची आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करायला तब्बल 60,190 दिवस लागतात. म्हणूनच नेपच्यूनवरील एक वर्ष हे पृथ्वीवरील एक वर्षाच्या तुलनेत 165 पटीने मोठे असते.
सगळे ग्रह वेगवेगळ्या गतीनं सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. याचाच अर्थ अधूनमधून ते सूर्याच्या एका बाजूला आलेले असतील. जर हे ग्रह आपापल्या मार्गक्रमणादरम्यान अगदी एकामागोमाग एक असे येऊन थांबले, तर पृथ्वीवरून ते सगळेच रात्री एकाच वेळी दिसू शकतात.
हे ग्रह ज्या मार्गावर एकामागोमाग एक थांबलेत त्या मार्गावर त्या दिशेने त्यांच्यावर सूर्याची किरणे पडत असतील, तर पृथ्वीवरून रात्री ती आपल्याला एकाच वेळेस एकत्र दिसतील. असा दुर्मिळ योग बऱ्याच वर्षांनी येतो. 28 फेब्रुवारीच्या रात्री हे सगळेच योगायोग जुळून येणार आहेत.
यापैकी बुध, शुक्र, मंगळ, ज्यूपिटर (बृहस्पती) आणि शनी हे ग्रह तुलनेनं सूर्याच्या जवळ असल्यामुळं त्यांच्यावर बऱ्यापैकी सूर्यप्रकाश पडतो आणि पृथ्वीवरून ते मग अशा वेळी उघड्या डोळ्यांनी दिसू शकतील.
युरेनस आणि नेपच्यून या सूर्यापासून सर्वात लांब असलेल्या ग्रहांना 28 फेब्रुवारीच्या रात्री बघण्यासाठी मात्र आपल्याला दुर्बीण अथवा टेलिस्कोपचा आसरा घ्यावा लागेल.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात हा नजारा पृथ्वीवासियांना पाहायला मिळणार आहे. अर्थात हे सगळे ग्रह एकाच रेषेत नाही, तर वक्राकार रेषेत आकाशात पाहायला मिळतील. कारण ग्रहांची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा वक्राकार रेषेत असते. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ज्या रात्री आकाश निरभ्र असेल, त्या रात्री सहा ग्रह वक्राकार रांगेत एकाच वेळी पृथ्वीवरून पाहता येतील.
खगोलशास्त्रात या घटनेला 'प्लॅनेटरी परेड' म्हणजेच 'ग्रहांची मिरवणूक' असं म्हटलं जातं. 28 फेब्रुवारी रोजी तर बुध ग्रह सुद्धा इतर सहा ग्रहांसोबत याच वक्राकार रेषेत येणार आहे. त्यामुळे 28 फेब्रुवारीच्या रात्री आकाशात एकाच वेळी 7 ग्रहांची दिमाखदार मिरवणूक निघालेली पृथ्वीवरील रहिवाशांना पाहायला मिळणार आहे.
"इतक्या दूरवरील परग्रहांना स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा अनुभव हा खरंच विस्मयकारक असतो. अर्थात तुम्ही गूगल करून हे ग्रह नेमके कसे आहेत, त्याची माहिती काढू शकता. त्यांचे चित्तवेधक फोटो देखील पाहू शकता. पण प्रत्यक्ष डोळ्यांनी हे ग्रह नजरेसमोर अनुभवण्यातील मजा काही वेगळीच आहे.
जो लांबवरचा एक छोटा ठिपका तुम्ही आकाशात बघाल तो प्रत्यक्षात अब्जावधी वर्षांपासून अनंत अशा अवकाशात अमाप वेगाने वाहणारे फोटॉन्स (प्रकाशकिरण) आहेत, ही जाणीव विश्वाचा पसारा किती अफाट आहे यावर विचार करायला आपल्याला भाग पाडते," अशा शब्दात इग्लंडमधील फिफ्थ स्टार या खगोल विज्ञानाच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या वैज्ञानिक जेनिफर मिलार्ड यांनी आपली उत्सुकता व्यक्त केली.
BBC BBCहा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा असला, तरी या खगोलीय घटनेचे दृश्यात्मकतेशिवाय आणखी प्रत्यक्ष परिणाम पृथ्वीवर होतात का? परिणाम होत असतील तर कोणते? आपली सूर्यमाला आणि त्या पलीकडीलही विश्वाचा पसारा समजून घेण्यासाठी याची काही मदत होऊ शकते का?
मिलार्ड यांच्यानुसार, असे सात ग्रह पृथ्वीवरून एकाच रेषेत आलेले पाहायला मिळणं हा अवकाशातील सतत चालू असलेल्या अजस्त्र घडामोडींमधील फक्त एक योगायोग आहे. ग्रह असे एका रेषेत आल्यामुळं त्याचा प्रभाव पृथ्वीवर जाणवतो, असा दावा काही अभ्यासकांनी केलेला असला, तरी या दाव्यांना पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा फक्त एक अंदाजच ठरतो.
2019 मध्ये एका संशोधनातून मात्र असं समोर आलं की, इतके सगळे ग्रह एकाच रेषेत आल्यावर सूर्याच्या हालचालींवर त्याचा परिणाम पडू शकतो. दुरून आपल्याला सूर्य एक निपचित पडलेला स्थिर गोळा भासत असला, तरी सूर्याच्या पृष्ठभागावर आणि आतमध्ये प्रचंड उलथापालथ सुरू असते.
सूर्य या अंतर्गत हालचालींमुळे कायम स्थित्यंतराच्या प्रक्रियेत असतो. या प्रक्रियेमुळं सूर्याची हालचाल अशी होते की, हळूहळू करत दर 11 वर्षांनी सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाची अदलाबदल होते. म्हणजे 11 वर्षांत सूर्याचं उत्तरेकडील टोक 180 अंशांनं फिरत जात दक्षिण टोकाला जाऊन पोहचतं. यालाच सूर्यचक्र (सनस्पॉट/सोलार सायकल) असं म्हणतात.
यादरम्यान सूर्याच्या अंतर्गत उलथापालथी चालूच असतात. त्यामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर डाग तयार होतात. त्याला सन स्पॉट असं म्हटलं जातं. हे सन स्पॉट यासाठी महत्वाचे आहेत की, सूर्याच्या अंतर्गत हालचालींमुळे तयार होणाऱ्या ताकदवान चुंबकीय क्षेत्राचे ते निर्देशक असतात.
Getty Images एकाच वक्राकार रेषेत आलेले 7 ग्रह रात्रीच्या आकाशात उघड्या डोळ्यांनी पाहण्याची रोमांचक मेजवानी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात खगोलप्रेमींना मिळणार आहे.सूर्याच्या पोटात मध्यभागी खोलवर असलेला घट्ट पदार्थ सतत बाहेर पडायचा प्रयत्न करतो. त्याच्या दबावामुळे सूर्याच्या अंतर्गत भागात प्रचंड उलथापालथ कायम होत असते. या उलाथापालथीमुळेच सूर्यावर चुंबकीय क्षेत्र तयार होते. या चुंबकीय बळामुळेच सूर्याची बाहेरील हालचाल होत असते.
परिणामी या अंतर्गत उलथापालथीच्या दबावामुळे सूर्याची स्थिती बदलू लागते. तसेच 11 वर्षांनी सूर्याचं उत्तर टोक दक्षिणेला आणि दक्षिण टोक उत्तरेला जाऊन पोहचतं. जितकी ही सूर्याच्या अंतर्गत चालू असणारी उलथापालथ जास्त, तितकी सूर्याच्या पृष्ठभागावरील सनस्पॉट्सची संख्या जास्त.
या सूर्यचक्रात ज्यावेळी सूर्याच्या अंतर्गत भागातील हालचाली सर्वात जास्त होतात म्हणजेच सनस्पॉट्सची संख्या सर्वात जास्त होते. म्हणजेच सूर्यावर सर्वात जास्त ताकदवान चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. त्या वेळेला सोलार मॅक्सिमम असं म्हटलं जातं.
सध्या सोलार मॅक्सिममचाच काळ सुरू आहे. याच्या उलट सूर्याच्या अंतर्गत हालचाली सर्वात कमी असतात तेव्हाचा काळ सोलार मिनिमम म्हणून ओळखला जातो. हे सूर्यचक्र नेमकं कशामुळे घडत असतं? हे खगोलविज्ञातील एक न सुटलेलं कोडं आहे.
जर्मनीतील ड्रेस्डेन - रोसेनडॉर्फमधील हेल्महोल्त्स - झेंट्रम संशोधन केंद्रातील भौतिकशास्त्रज्ञ फ्रँक स्टेफनी यांच्या म्हणण्यानुसार शुक्र, पृथ्वी आणि ज्यूपिटरच्या गुरुत्वीय बलाचा परिणाम सूर्यावर होतो. हेच गुरुत्वीय बळ सूर्यचक्र घडून येण्यासाठी कारणीभूत ठरतं.
Getty Imagesअर्थात सूर्याच्या तुलनेत इतक्या लहान आणि सूर्यापासून इतक्या लांब असलेल्या या ग्रहांच्या तोकड्या गुरुत्वीय बलाचा महाकाय सूर्यावर इतका जास्त परिणाम होणं अवघड आहे. मात्र, फ्रँक सांगतात की, हे सगळे ग्रह जर सूर्यासमोर एका रेषेत येऊन थांबतात, तेव्हा या सगळ्या ग्रहांच्या एकत्रित गुरुत्वीय बळाच्या प्रभावामुळे सूर्याच्या अंतर्गत कंपनं निर्माण होतात.
सूर्यावरील या कंपनांना 'रॉसबे वेव्हज' असं म्हटलं जातं. या रॉसबे वेव्हजमुळेच सूर्यासह सूर्यमालेतील इतर ग्रहांवरील वातावरणात बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ रॉसबे वेव्हजमुळे पृथ्वीवर चक्रीवादळं तयार होतात.
हे सगळे ग्रह सूर्यासमोर एका रेषेत आल्यामुळे सूर्यावर त्याचा काय प्रभाव होईल, याचा स्टिफनी फ्रँक यांनी खोलात जाऊन अभ्यास केला आणि सूर्यचक्रावरच यामुळे प्रभाव पडणार असल्याचा दावा केला.
मात्र, अनेक वैज्ञानिकांना हा दावा मान्य नाही. सूर्याची हालचाल प्रभावीत करू शकतील इतके हे ग्रह ताकदवान नाहीत, असं इतर शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर सोलार सिस्टीम रिसर्चमध्ये सौर वैज्ञानिक म्हणून कार्यरत असणाऱ्या रॉबर्ट कॅमरून यांनी 2022 साली याच विषयावर आपला शोधनिबंध सादर केला होता. ते सुद्धा अशाप्रकारे ग्रह एका रेषेत आल्याचा परिणाम सूर्यावर होऊ शकत नाही, असं सांगतात.
पण अशाप्रकारे ग्रह एका रेषेत आल्याचा होणारा एक फायदा मात्र निर्विवादपणे सगळेच जण मान्य करतात. तो म्हणजे आपल्या सूर्यमालेविषयी नवी माहिती जाणून घेण्याची आलेली आयती संधी.
Getty Images 2024 मध्ये मंगळ आणि ज्यूपिटर हे ग्रह पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनी पाहता आले. आता जानेवारी 2025 मध्ये शुक्र, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह सुद्धा पृथ्वीवरून पाहता येतील.अवकाशयान परग्रहावर पाठवणं ही तशी प्रचंड अवघड आणि खर्चिक गोष्ट आहे. कित्येक प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या या ग्रहांवर अवकाशयान पाठवलं, तरी या यानाला तिथे पोहचायला कित्येक दशक लागतात.
मात्र, अशा पद्धतीने विशिष्ट रचनेत ग्रह पृथ्वीच्या रेषेत येऊन थांबल्यावर या ग्रहांनी निर्माण केलेल्या गुरुत्वीय बलाचा आयता वापर करून पृथ्वीवरून अवकाशयान लांबच्या ग्रहावर पाठवणं सोपं होऊन जातं. अमेरिकेतील अवकाश संस्था असलेल्या नासाची व्होयेजर अवकाश मोहीम हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल.
1966 मध्ये नासामधील एक वैज्ञानिक गॅरी फ्लॅन्ड्रो यांनी सांगितलं की, 11 वर्षांनी म्हणजेच 1977 मध्ये ज्यूपिटर, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह एका रेषेत येणार आहेत. त्यासाठी गॅरीने याची सगळी गणितं आधीच बांधून ठेवली होती.
गॅरीनं मांडलेल्या सूत्रानुसार यावेळी मग पृथ्वीच्या परिघातून एका विशिष्ट पद्धतीनं अवकाशयान अवकाशात पाठवलं, तर या एका रेषेत आलेल्या ग्रहांच्या एकत्रित गुरुत्वीय बलानं हे अवकाशयान अतिशय प्रभावीपणे अवकाशात झेपावू शकतं.
गॅरीनं मांडलेल्या हिशोबानुसार अवकाशयान ज्यूपिटर, शनी, युरेनस आणि नेपच्यून या चार ग्रहांवर पाठवण्यासाठी त्या यानाला एरवी 30 वर्ष प्रवास करावा लागेल. मात्र, एका रेषेत आलेल्या ग्रहांच्या एकत्रित गुरुत्वीय बलाचा यानाला आधार मिळाला, तर तेच यान 12 वर्षात आपला हा प्रवास पूर्ण करू शकेल. ग्रहांचं असं एका रांगेत येणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे.
गॅरीच्या म्हणण्यानुसार, नासानं याचा फायदा घ्यायला हवा. कारण असा योग 175 वर्षांतून फक्त एकदाच येतो. गॅरीनं मांडलेल्या सूत्रानुसार नासानं व्होयेजर ही अवकाश मोहीम आखली. व्होयेजर 1 आणि व्होयेजर 2 हे दोन अवकाशयान नासानं 1977 मध्ये अंतराळात पाठवले. ही तेव्हापर्यंतच्या इतिहासातील जगातील सर्वात महत्त्वकांक्षी अवकाश मोहीम होती.
Getty Imagesव्होयेजर 1 हे अवकाशयान 1979 मध्ये ज्यूपिटर आणि 1980 मध्ये शनी ग्रहावर पोहचलं. पण या यानाला पुढे युरेनस आणि नेपच्यूनवर पाठवण्याच्या योजनेत शास्त्रज्ञांनी ऐनवेळी बदल केला. त्या ऐवजी टायटन या शनीच्या उपग्रहाकडं हे यान पाठवण्यात आलं. कारण ग्रहांच्या स्थानानुसार गुरुत्वीय बलाचा लाभ यानाला करून घ्यायचा असेल, तर त्यावेळी व्होयेजर 1 साठी तेच जास्त संयुक्तिक ठरणार होतं.
मात्र, व्होयेजर 2 या अवकाश मोहिमेतील दुसऱ्या अवकाशयानानं ज्यूपिटर आणि शनिसह युरेनस आणि नेपच्यून अशा चारही ग्रहांची यशस्वी सफर केली. एका रांगेत आलेल्या ग्रहांच्या एकत्रित गुरुत्वीय बलाचा वापर करून या यानानं तब्बल चार ग्रहांची स्वारी एकाच मोहीमेत पार पाडली.
अशा पद्धतीनं युरेनस आणि नेपच्यून या पृथ्वीपासून सर्वात लांबच्या ग्रहांवर पोहचणारं ते इतिहासातील पहिलं अवकाशयान ठरलं. व्होयेजर 2 नं 1986 मध्ये युरेनस आणि 1989 मध्ये नेपच्यूनवर पदार्पण करत विक्रम रचला.
"या मोहिमेत सगळ्याच गोष्टी अगदी जुळून आल्या. त्यामुळेच ही मोहीम इतक्या सुकरपणे पार पडली. अन्यथा हे एरवी शक्यच झालं नसतं. उदाहरणार्थ 1977 ऐवजी कोणत्या दुसऱ्या वेळी नेपच्यूनवर अवकाशयान पाठवलं असतं, तर त्याला नेपच्यूनवर पोहचायला तब्बल 30 वर्ष लागली असती. त्याचा खर्च हा महाकाय असला असता."
"मुळात इतके पैसेच कोणी नासाला दिले नसते. त्यामुळे 1977 ची व्होयेजर मोहीम ही अनेक अर्थांनी महत्वाची ठरते," अशा शब्दात या मोहीमेत सहभागी असलेल्या कोलोरॅडो विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन बेगनल यांनी आपला आनंद व्यक्त केला.
ग्रहांच्या अशा पद्धतीनं एका रेषेत येण्याच्या योगामुळं फक्त आपल्याच सूर्यमालेचा नव्हे, तर त्यापलीकडील विश्वाच्या पसाऱ्याचा अभ्यास करणं देखील सोप्पं होऊ शकतं. आकाशगंगेतील इतर सूर्याभोवती फिरणाऱ्या परग्रहांचा शोध घेऊन त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या ग्रहांचं एका रेषेत येणं उपयोगी ठरू शकतं.
Getty Images प्रातिनिधीक फोटोआकाशगंगेतील इतर सूर्यमालेतील ग्रहांबद्दल जाणून घेण्याच्या या ज्ञानशाखेला ट्रान्झिट पद्धत म्हणतात. जेव्हा या बाहेरच्या सूर्यमालेतील परग्रह एखाद्या ज्ञात असलेल्या ताऱ्या समोरून जातो तेव्हा त्याची सावली त्या ताऱ्यावर पडते आणि ताऱ्याचा प्रकाश त्या प्रमाणात कमी होतो.
अशा वेळी हा तारा नेमका किती आणि कसा झाकोळला गेला आहे, याचा अभ्यास करून त्या परग्रहाचा आकार आणि कक्षा / मार्गक्रमणाचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
या ट्रान्झिट पद्धतीनंच मानवानं आजतागायत अंतराळातील हजारो प्रकाश वर्ष दूर असलेल्या अनेक ग्रहांचा शोध लावला आहे. उदाहरणार्थ ट्रॅपिस्ट - 1 हा पृथ्वीवरून 40 प्रकाश वर्ष दूर असलेला एक बटू तारा आहे. तुलनेनं आकारानं लहान आणि कमी प्रकाशमान असलेल्या ताऱ्याला बटू तारा (ड्वार्फ स्टार) असं म्हटलं जातं. या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या साधारणतः पृथ्वीच्याच आकाराच्या 7 ग्रहांचा शोध शास्त्रज्ञांना ट्रान्झिट पद्धतीनंच लावता आला.
विशेष म्हणजे या ट्रॅपिस्ट - 1 तारा मंडळातील ग्रह तिथल्या सूर्याभोवती अगदी वेगळ्या प्रकारे प्रदक्षिणा घालतात. ट्रॅपिस्ट - 1 या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालणारे ग्रह एकमेकांच्या परस्परसंबंधाने या सूर्याभोवती फिरत असतात.
उदाहरणार्थ सर्वात बाहेरचा / लांबचा ग्रह एका ठराविक वेळेत ट्रॅपिस्ट - 1 या त्यांच्या सूर्याभोवती दोन प्रदक्षिणा पूर्ण करत असेल, तर त्याच्या पुढचा ग्रह (जो त्या सूर्याला आणखी जवळ आहे) त्याच वेळेत या सूर्याभोवती आपल्या तीन प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्याचा पुढचा ग्रह त्याच वेळेत चार प्रदक्षिणा पूर्ण करतो.
अशा पद्धतीने एका गणितीय सूत्रानुसार ट्रॅपिस्ट - 1 सूर्यमालेतील ग्रह एकमेकांच्या परस्परसंबंधानं आपल्या सूर्याभोवती फिरत असतात. त्यामुळे या सूर्यमालेत असाही योग येतो जेव्हा सगळेच ग्रह सरळ एकाच रेषेत एकापाठोपाठ एक उभे येऊन ठाकतात. पृथ्वीचा समावेश असलेल्या आपल्या सूर्यमालेत असं होत नाही.
पृथ्वीसह आपल्या सूर्यमालेतील सगळेच ग्रह आपापल्या पद्धतीनं दुसऱ्या ग्रहांशी कुठलाच संबंध न ठेवता सूर्याभोवती स्वतंत्रपणे प्रदक्षिणा घालत असतात.
आपल्या सूर्यमालेत प्रत्येक ग्रहाचा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचा वेग आणि कक्षा वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या सूर्यमालेतील ग्रह कधीच सरळ रेषेत एकामागोमाग एक असे येऊ शकत नाहीत. ते जास्तीत जास्त फक्त एका वक्राकार रेषेत येऊ शकतात.
Getty Imagesट्रान्झिट पद्धत वापरून या दुसऱ्या सूर्यमालेतील ग्रहांवरील हवामान आणि वातावरण कसं असेल, याचाही अंदाज बांधता येऊ शकतो.
"एखाद्या परकीय ग्रहावर हवामान आणि वातावरण अस्तित्वात असेल, तर जेव्हा हा ग्रह आपल्या प्रदक्षिणेदरम्यान त्या सूर्यमालेतील सूर्यासमोर सरळ रेषेत येईल, तेव्हा तिथल्या सूर्याची किरणे थेट त्या ग्रहावर पडतील. ग्रहावरील काही विशिष्ट वायू आणि पदार्थांचे अणू - रेणू ही प्रकाश किरणे शोषून घेतात."
"ही प्रकाश किरणे जर शोषून घेतली गेल्याचं आपल्याला आढळलं, तर याचाच अर्थ त्या ग्रहावर कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजनसारखे वायू पदार्थ अस्तित्वात आहेत, असा होतो. विश्वाच्या पसाऱ्यातील बहुतांश ग्रहावरील वातावरणाचा अभ्यास आपले खगोलशास्त्रज्ञ याच पद्धतीने करतात," जेस्सी ख्रिस्टनस्टेन यांनी ही सगळी प्रक्रिया थोडक्यात समजावून सांगितली.
जेस्सी ख्रिस्टनस्टेन या स्वतः कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील नासा एक्सोप्लॅनेट सायन्स विभागात खगोलशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
जर अशा पद्धतीनं फक्त ग्रहच नाही तर विश्वाच्या अनंत पसाऱ्यातील आकाशगंगा देखील अशाच पद्धतीनं त्यांच्या परिक्रमाणादरम्यान एका रेषेत आल्या तर विश्वाचाही अभ्यास करता येऊ शकतो.
एरवी या आकाशगंगा आपल्यापासून इतक्या लांब असतात की त्यांचा अभ्यास किंवा निरीक्षण करणं अशक्य होऊन जातं. पण कधी या दूरच्या आकाशगंगेच्या रेषेत आणखी आकाशगंगा येऊन उभ्या ठाकल्या तर या तुलनेनं जवळच्या आकाशगंगेचं गुरुत्वीय/चुंबकीय बल एकाच रेषेत आलेल्या त्या लांबच्या आकाशगंगेवर प्रभाव पाडू शकतं.
या चुंबकीय बलामुळे लांबच्या आकाशगंगेवर पडणारा प्रकाश आपल्याला अधिक उठून दिसू शकतो. तेव्हा या लांबच्या आकाशगंगेचं निरीक्षण करणं शक्य होऊ शकतं. अशा पद्धतीने दोन किंवा अनेक आकाशगंगांमधील गुरुत्वीय बलाच्या परस्पर प्रभावाचा फायदा घेऊन केल्या जात असणाऱ्या आकाशगंगेच्या अभ्यासाला ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग असं म्हणतात.
विश्वाच्या या अनंत पसाऱ्यात इतक्या उलथापालथी सतत घडत असतात की, अनेक ग्रह, तारे, सूर्यमाला किंबहुना आकाशागंगासुद्धा अधूनमधून एकाच रेषेत एकामागोमाग उभ्या येऊन टाकतात. याचाच फायदा घेतात अत्याधुनिक टेलिस्कोपच्या मदतीनं अगदी लांबच्या ताऱ्यांचा, आकाशगंगांचा अभ्यास केला जातो.
एरेंडेल हा एक पृथ्वीवरून आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतका लांबचा तारा दूरच्या आकाशगंगेत अस्तित्वात आहे. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीनं खगोलशास्त्रज्ञांनी हा तारादेखील काही वर्षांपूर्वी शोधून काढला.
हा आजघडीला मानवाजातीला ज्ञात असलेला पृथ्वीपासून सर्वात लांबचा तारा आहे. हा तारा किती लांब आहे याचा अंदाज तुम्ही खालील माहितीवरून लावू शकता. आपल्या विश्वाचा उगम 13.7 अब्ज वर्षांपूर्वी झालेला आहे. आज या एरेंडेल ताऱ्यावरून आलेले जे प्रकाशकिरण आपण जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीनं पाहतो आहोत ते प्रकाश किरण विश्वाच्या उगमाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे साधारणतः 12 - 13 अब्ज वर्षांपूर्वी या ताऱ्यातून निघाले होते.
ते प्रकाशकिरण पृथ्वीवरील मानवी डोळ्यांच्या परिप्रेक्ष्यात (तेसुद्धा ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंगमुळे) पोहचण्यासाठी अतिशय वेगानं प्रवास करणाऱ्या प्रकाश किरणाला 12 - 13 अब्ज वर्ष लागत असतील तर हा एरंडेल तारा आपल्यापासून किती लांब आहे, याचा अंदाज आता तुम्हीच लावा.
Getty Imagesअशा पद्धतीने ग्रह, तारे, आकाशगंगा एकाच रेषेत एकामागोमाग आल्याचे इतरही फायदे वैज्ञानिकांनी सांगितले आहेत. या विशिष्ट रचनेतून बाहेरच्या सूर्यमालेतील ग्रहांवरील सजीव सृष्टीच्या अस्तित्वाची शक्यताही पडताळली जाऊ शकते, असा काही वैज्ञानिकांचा दावा आहे.
2024 साली पेनसिल्वेनिया विद्यापीठातील निक ट्यूसे या विद्यार्थ्यानं असा प्रयत्न केला होता. एकापाठोपाठ एकाच रेषेत आलेल्या ग्रहांच्या स्थितीचा वापर करून ट्रॅपिस्ट - 1 या सूर्यमालेतील कुठल्या ग्रहावर सजीव राहतात का? हे शोधण्याचा त्यानं प्रयत्न केला.
आपण पृथ्वीवरील लोक अंतराळात मंगळासारख्या इतर ग्रहांवर पाठवलेल्या अवकाशयानाशी संपर्क साधण्यासाठी संवादाची यंत्रणा वापरतो. पृथ्वीवरून मंगळावर सॅटेलाईट यंत्रणेच्या माध्यमातून मानवानं संदेश पाठवला की, त्यासाठी वापरल्या गेलेल्या सिग्नल्सचे अंश आपल्या सूर्यमालेत विखुरलेले पाहायला मिळतात. अशा कोणत्या सिग्नल्सचे अंश ट्रॅपिस्ट - 1 या सूर्यमालेत विखुरलेले आढळून येतात का? हे शोधण्याचा प्रयत्न निकनं केला.
आपल्या सूर्यमालेतील पृथ्वीवरील मानवाप्रमाणेच तिथल्या सूर्यमालेतील एखाद्या ग्रहावर अस्तित्वात असणारे सजीव त्यांच्या सूर्यमालेत आंतरग्रहीय संवाद साधण्यासाठी प्रयत्न करत असतील, तर त्या संवादाचे पुरावे सिग्नलच्या रूपात ट्रॅपिस्ट - 1 सूर्यमालेच्या कक्षेत विखुरलेले आपल्याला आढळून येतील. त्यावरून मग परग्रहावर सजीव अस्तित्वात असल्याचं स्पष्ट होऊ शकेल.
अर्थात निक ट्यूसे हा महत्वकांशी प्रयोग सहाजिक मर्यादांमुळे पूर्णत्वास नेऊ शकला नाही. मात्र, विश्वाच्या पसाऱ्यात मानवाव्यतिरिक्त इतर सजीव अस्तित्वात असतील का? याचा शोध घेण्याची नवी दिशा मात्र या निमित्तानं आपल्याला मिळाली आहे.
कदाचित ते सजीवसुद्धा दुसऱ्या कोणत्या सूर्यमालेतील ग्रहांवर आपल्यासारखेच सजीव अस्तित्वात आहेत का? याचा शोध घेत असतील. त्यासाठी त्यांनीही कदाचित या ग्रहताऱ्यांच्या एका रेषेत येण्याच्या योगायोगाचा वापर केला असेल.
एलियन्स अस्तित्वात असतील का? या कल्पनाविलासात माणसानं गेली कित्येक वर्षे घालवली आहेत. कारण अजूनही कोणीतरी आपल्यासारखाच जीव दूर कुठेतरी राहत असेल ज्याची आपल्याला कल्पना नाही, हा विचारच अतिशय रोमांचक आहे. त्यामुळे एलियन्सविषयची उत्सुकता ही कधीही न संपणारी आहे. पण आत्तापर्यंत तरी पृथ्वीव्यतिरिक्त आणखी कुठल्या ग्रहावर सजीव अस्तित्वात असल्याचा पुरावा माणसाला शोधता आलेला नाही, हेही तितकंच खरं आहे.
ते काहीही असो, पण अवकाशातील घडामोडींबद्दल कुतूहल असेल, तर येत्या 28 फेब्रुवारीला एका रेषेत एकामागोमाग एक चालत जाणाऱ्या या 7 ग्रहांची दिमाखात निघणारी परेड बघायची संधी अजिबात दवडू नका.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)