खासदाराच्या सुनेचं बनावट सोशल मीडिया अकाउंट उघडलं, आर्थिक मदतीचं आवाहन
esakal January 29, 2025 07:45 AM

खासदार धनंजय महाडिक यांची सून वैष्णवी महाडिक यांच्या नावे फेक अकाउंट काढून एका संस्थेला आर्थिक मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट लिहून वैष्णवी महाडिक यांनी फेक अकाउंटवरून करण्यात आलेल्या आवाहनावर प्रतिसाद देऊ नये असं म्हटलंय. फेक पेजला रिपोर्ट करा आणि कोणतीही आर्थिक मदत पाठवू नका असं वैष्णवी महाडिक यांनी सांगितलंय. वैष्णवी महाडिक या खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र पृथ्वीराज महाडिक यांची पत्नी आहेत.

वैष्णवी यांच्या बनावट इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करण्यात आली होती. यात म्हटलं होतं की, वैष्णवी महाडिक यांच्या संयुक्त विद्यमाने लहानसा कार्यक्रम आयोजित केलाय. बालगृहातील लहान मुलांना वही, पेन, खाद्यपदार्थ वाटप करायचे आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी आर्थिक सहकार्य करावं. तसंच या कार्यक्रमालाही उपस्थित रहा असं आवाहन केलं गेलं होतं. ऑनलाइन पेमेंटची विनंतीही करण्यात आली होती.

बनावट खात्यावरून करण्यात आलेल्या आवाहनाची पोस्ट शेअर करत वैष्णवी महाडिक यांनी संबंधित पेजला रिपोर्ट करण्याचं आणि कोणतीही आर्थिक मदत न करण्याचं आवाहन केलं. माझी कोणतीही टीम नाही आणि अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं नाहीय असंही त्यांनी म्हटलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.