कोवाड : चिंचणे (ता. चंदगड) येथे ताम्रपर्णी नदीपात्रात मगरीचा वावर आहे. अनेक दिवसांपासून नागरिकांना मगरीचे नदीकाठावर दर्शन होत आहे. बुधवारी दुपारी कचेरीपट्टी नावाच्या शेतात नदीतून गवतात आलेली मगर नागरिकांना दिसली. एकाच ठिकाणी वारंवार मगर दिसत असल्याने भीती व्यक्त होत आहे. वनविभागाने मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
डिसेंबरपासून राजगोळी बुद्रूक ते चिंचणे गावापर्यंत नदीकाठावर ठिकठिकाणी मगरीचे दर्शन होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राजगोळी ब्रदूक येथील नागरिकांनी नदीत जाण्याचे टाळले आहे. नदीकाठावरील सर्वच गावांतून पाण्यासाठी जनावरे नदीत सोडली जातात. धुणे धुण्यासाठी महिलाही नदीकडे जातात.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नदीत पोहणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. उसाचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. ऊस तोडणी मजुरांचीही पाण्यासाठी नदीकाठावर सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे नदीकाठावरील सर्वच शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. चिंचणे व राजगोळी या दोन्ही ठिकाणी मगरीचे सतत दर्शन होत आहे. मगरीचा मुक्काम वाढला असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.