उरुळी कांचन : पत्नीवर वाईट नजर ठेवल्याच्या रागातून ऊस तोडण्याच्या कोयत्याने वडिलांवर वार करून त्यांचा खून करणाऱ्या मुलास जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जन्मठेपेसह २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सचिन अंबादास खोत (रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे न्यायालयाने शिक्षा केलेल्या मुलाचे नाव आहे तर अंबादास दिगांबर खोत असे खून झालेल्या त्याच्या वडिलांचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पत्नीवर वाईट नजर ठेवल्याच्या रागातून आरोपी सचिन खोत याने वडील अंबादास खोत यांच्यावर २९/१०/२०१४ रोजी रात्री ऊस तोडण्याच्या लोखंडी कोयत्याने वार केले. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सचिन खोत याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजितसिंग यांनी सखोल तपास आरोपी विरोधात न्यायालयात सबळ पुराव्यासह आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव न्यायालयात झाली. अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी न्यायालयात सरकार पक्षातर्फे बाजू भक्कमपणे मांडली. पुरावे सादर केले. न्यायालयाने पुराव्याची पडताळणी करून आरोपी सचिन खोत याला जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ०५ चे पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार ललीता कानवडे यांनी सर्व साक्षीपुरावे वेळेत सादर केले.