बदलापूर: शहरातील सर्व खासगी रुग्णालये आता चौकशीच्या फेऱ्यात येणार आहेत. नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे पाळत या रुग्णालयातील कामकाज सुरू आहे का? यासंदर्भात आता ठाणे सिव्हिल सर्जनच्या पथकाकडून शहरातील सगळ्या खासगी रुग्णालयांची तपासणी होणार आहे. इथल्या एका खासगी रुग्णालयात प्रवीण समजिस्कर या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर खासगी रुग्णालयातील रुग्णसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये शहरातील एका ३४ वर्षीय प्रवीण समजिस्कर या युवकाचा अपघात झाला होता. या वेळी त्याच्या जबड्याला जी दुखापत झाली होती, त्यासाठी एक छोटे ऑपरेशन करण्यात येणार होते. या वेळी कुटुंबाने उपचारासाठी दाखल केलेल्या येथील एका खासगी रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन होण्यापूर्वीच प्रवीणचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनवणे यांनी आरोग्य विभागाकडे केली होती.
त्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित रुग्णालयातील या घटनेची व इतर वेळी रुग्ण सेवा पुरवत असताना, काय त्रुटी जाणवत आहेत, यासाठी हॉस्पिटल संदर्भात द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बदलापुरात आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डिग्री असणाऱ्या डॉक्टरांना ॲलोपॅथी रुग्णालय उघडण्याची परवानगी कशी दिली गेली? यासंदर्भाची तक्रार आरोग्य विभागाकडे केली होती. या अनुषंगाने आता बदलापुरातील सर्व रुग्णालयांची तपासणी केली जाणार आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये संबंधित घटनेत रुग्णालयाच्या नियमबाह्य कारभारामुळेच माझ्या पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, संबंधित रुग्णालयावर योग्य ती कारवाई करून, हे रुग्णालय बंद करावे आणि माझ्या पतीला न्याय द्यावा, अशी मागणी प्रवीण यांच्या पत्नीने केली आहे.
माहितीच्या अधिकाराचा अर्ज व्हायरलप्रवीण समजिस्कर या युवकाच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या रुग्णालयाच्या माहितीच्या अधिकारात जी माहिती संगीता चेंदवणकर व अविनाश सोनवणे यांनी मागवली होती, तो माहितीचा अर्ज समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे असे होत असेल, तर आमच्या जीवाला धोका आहे, असे चेंदवणकर यांचे म्हणणे आहे.