Mallikarjun Kharge : कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या सांगा; खर्गे यांचे केंद्र सरकारला आवाहन, गंगा प्रदूषित झाल्याची केली टीका
esakal February 04, 2025 07:45 AM

नवी दिल्ली - कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून राज्यसभेमध्ये आज गदारोळ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या निमित्ताने विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर हल्ला चढविताना कुंभमेळ्यातील मृत्यूंचा आकडा का सांगितला जात नाही, असा सवाल केला. तसेच. श्रद्धाळूंमुळे नव्हे तर पापी लोक गेल्यामुळे गंगा प्रदूषित झाल्याचा टोला त्यांनी लगावला.

राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर शून्यकाळात सुरवातीलाच विरोधकांनी प्रयागराज कुंभमेळ्यातील घटनेचा मुद्दा उपस्थित करून सभात्याग केला होता. दुपारी राष्ट्रपती अभिभाषणावर चर्चा सुरू झाल्यानंतर खर्गे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील मुद्दे, अर्थसंकल्पातील घोषणा तसेच कुंभमेळ्यातील दुर्घटना, राज्यपालांचा कथित हस्तक्षेप यासारख्या विषयांवरून उपरोधिक शैलीत सरकारवर शरसंधान केले. त्यांच्या तासाभराच्या भाषणादरम्यान सभापती जगदीप धनकड यांच्याशी बऱ्याचदा शाब्दिक चकमकही झडली.

खर्गे म्हणाले, ‘गंगा शुद्ध करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु सारे जण गंगेत स्नान करून आले, त्यामुळे ती पुन्हा प्रदूषित झाली.’ त्यांच्या या वक्तव्याला सत्ताधारी बाकांवरून आक्षेप घेण्यात आला. वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी हा कुंभमेळ्याचा अपमान असल्याचे म्हटले. पीठासीन अधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केल्यानंतर खर्गे यांनी यावर सारवासारव करताना श्रद्धाळूंच्या जाण्यामुळे नव्हे, तर पापी लोकांच्या जाण्याने गंगा प्रदूषित झाली, असे विधान केले.

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा उल्लेख करताना खर्गे यांनी हजारो बळी असल्याचा दावा केला. त्यावरही जोरदार आक्षेप घेण्यात आला. सभापती धनकड यांनी हा दावा सिद्ध करण्याचे आव्हान खर्गे यांना दिले. तसेच अशा वक्तव्यातून चुकीचा संदेश जात असल्यामुळे ते मागे घ्यावे, असेही सुचवले. खर्गे यांनी हा अंदाज असल्याचे सांगितले. तसेच तो चुकीचा असल्यास सरकारने खरी आकडेवारी सादर करावी, असे आवाहनही केले.

खर्गे म्हणाले

  • देशात अमृतकाल आहे की विषकाल?

  • मागील गेल्या दहा वर्षांत एक लाख शेतकऱ्यांची आत्महत्या

  • शेतकऱ्यांना कायदेशीर हमीभाव नाही

  • संघाच्या नेत्यांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भाग न घेण्याचे आवाहन केले होते

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाला श्रीपाद डांगे आणि सावरकर जबाबदार

गोयल यांचा दावा

वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सरकारची बाजू मांडताना कुंभमेळ्यातील व्यवस्थापनाची प्रशंसा केली. पंडित नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळामध्ये १९५४ मधील कुंभमेळ्यात ८०० जणांचा चेंगराचेंगरीत बळी गेला होता, तर राजीव गांधींच्या काळात १९८६ मध्ये २०० जण मृत्यूमुखी पडले होते, असा दावा त्यांनी केला.

गोयल हे लोकसभेचे सदस्य असताना राज्यसभेत त्यांना बोलण्याची परवानगी कशी मिळाली असा आक्षेप विरोधकांनी नोंदविला. पीठासीन अधिकारी जगदीप धनकड यांनी हा आक्षेप नाकारताना मंत्री या नात्याने त्यांना चर्चेत सहभागाची परवानगी दिल्याचे स्पष्ट केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.