नवी दिल्ली : देशातील भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढीने नव्यावर्षाची सुरुवात मजबूत पायावर केली असून, जानेवारीमध्ये या क्षेत्राच्या वाढीच्या दराने सहा महिन्यांचा उच्चांक नोंदवला आहे. जवळपास १४ वर्षांनंतर प्रथमच निर्यातीत झालेल्या सर्वाधिक वाढीमुळे हा उच्चांक नोंदवणे शक्य झाल्याचे एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) या मासिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.
‘एचएसबीसी इंडिया’च्या अहवालानुसार, जानेवारीमध्ये उत्पादन क्षेत्राचा ‘पीएमआय’ डिसेंबरमधील एका वर्षाच्या नीचांकी ५६.४ वरून ५७.७ वर पोहोचला आहे. ही वाढ लक्षणीय आणि ऑक्टोबर २०२४ नंतरची सर्वांत जलद आहे. फेब्रुवारी २०११ नंतर निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत मागणीत वाढ आणि आंतरराष्ट्रीय विक्रीत वाढ झाल्याने निर्यातीतही मोठी वाढ झाली. नवीन ऑर्डरमध्येही लक्षणीय वाढ झाल्याने उत्पादन ‘पीएमआय’ जानेवारीमध्ये उच्चांकावर गेल्याचे ‘एचएसबीसी’चे मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले.
मजबूत विक्री वाढ आणि उत्साहवर्धक अंदाजांमुळे कंपन्यांना या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या सुरुवातीला अतिरिक्त कामगारांची भरती करण्यासही प्रवृत्त केले. इनपुट खर्चाची चलनवाढ दुसऱ्या महिन्यात कमी झाली, ज्यामुळे उत्पादकांवर अंतिम उत्पादन किंमत वाढवण्याचा दबाव कमी झाला, असेही भंडारी यांनी नमूद केले.
वाढीच्या शक्यतांसाठी चांगले संकेत‘‘नव्या ऑर्डर मिळाल्याने भारतातील उत्पादकांनी उत्पादनाचे प्रमाण वाढवले. कंपन्या उत्पादनवाढीबाबत आशावादी असून, जवळपास ३२ टक्के कंपन्यांनी वाढीचा अंदाज वर्तवला आणि फक्त एक टक्के कंपन्यांनी कपातीची अपेक्षा केली. वाढती मागणी, चांगले ग्राहक संबंध, अनुकूल आर्थिक परिस्थिती आणि विपणन प्रयत्न हे सर्व वाढीच्या शक्यतांसाठी चांगले संकेत आहेत.’’