छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र सरकारनं पीक विमा घोटाळा प्रकरणी मोठं पाऊल उचललं आहे. बोगस पीक विमा भरणाऱ्या महाराष्ट्रातील आणि परराज्यातील 96 नागरी सुविधा केंद्र म्हणजेच सीएससीचे आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. बीड, धाराशिवसह विविध जिल्ह्यांमध्ये गायरान जमीन, शासनाची जमीन, देवस्थानची जमीन या क्षेत्रावर पीक विमा नोंदवला गेल्याची प्रकरणं उघकीस आली होती. बनावट पीक विमा भरण्यामध्ये सीएससी धारकांना आता दणका देण्यात आला आहे. त्यांचे सीएससी आयडी रद्द करण्यात आले आहेत.
बोगस पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील 96 सीएससी आयडी ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बनावट पीक विमा भरणारे 35 सीएससीधारक बीड जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं आहे. 22 जणांचे सीएससी आयडी परळी तालुक्यातील असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात बनावट पीक विमा भरणारे 7 सीएससीधारक इतर राज्यांतील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील 2, बंदा जिल्ह्यातील अत्तारा येथील 1, हरदोई जिल्ह्यातील 2, तर हरयाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यातील 2 बनावट पीक विमा भरणारे सीएससीधारक आहेत. या सर्वांचे सीएससी आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सराकरनं केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1 रुपयात पीक विमा योजना आणली होती.या योजनेद्वारे शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया भरल्यानंतर पीक विमा काढता येत होता. मात्र, काही लोकांनी या योजनेचा गैरफायदा घेत बनावट पीक विमा उतरवला.
गायरान,सरकारी जमिनीसह रस्ते,कालवे असलेल्या जमिनीवरही पीकविमा उतरवण्यात आला. सरकारी गायरान जमीन, विविध तलावांसाठी संपादित जमीन,लघु पाटबंधारे तलाव,मांजरा तलावासाठी संपादित केलेली जमीन,राखीव वनजमीन,शाळेच्या नावे असलेली जमीन, कालवे, रस्ते…यावर पिकविमा काढून सरकारची फसवणूक केली गेली आहे. बीडपरभणी, धाराशिवमध्ये बनावट पीक विम्याचे प्रकार उघडकीस आले होते. सीएससी केंद्र चालकांना पीक विम्याचा एक अर्ज भरण्यासाठी 40 रुपये दिले जायचे. या योजनेचा गैरफायदा घेत सीएससी केंद्र चालकांनी गैरप्रकार केले. धाराशिव जिल्ह्यातील जमिनीवरील पीक विम्याचे अर्ज परळीतील सीएससी केंद्रावरुन भरले गेल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांकडून पीक विमा घोटाळ्याची चौकशी करुन, श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली होती.
इतर बातम्या :
अधिक पाहा..