आशा नेगी
कर्करोग झाल्यानंतर अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. मनात येणारे असंख्य विचार, मनाला पडणारे कित्येक प्रश्न?... मीच का? मलाच का?!! अशा खूप साऱ्या प्रश्नचिन्हांच्या चक्रव्यूहामध्ये मीही अडकले होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठून मिळवावीत हे समजत नव्हतं. कुणाशी बोलू हे कळत नव्हतं...
शरीराला झालेल्या आजाराचे डॉक्टर सगळीकडे भेटतात; पण मनात उमटलेल्या प्रश्नांचे डॉक्टर भेटणं जरा अवघड होतं. त्यावेळी, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधावी लागली. सैरभैर होणाऱ्या मनाला कंट्रोलमध्ये आणलं. नजरेसमोर दोन गोंडस मुलींना आणलं. आयुष्यावर असलेल्या माझ्या आसक्तीचा विचार केला आणि मरगळ झटकून टाकली. हे सर्व काही लगेच झालं नाही; पण तिथपर्यंत जाण्यासाठी मी खूप वेळ घेतला नाही. मात्र, त्याच्यासाठी मानसिक त्रास झालाच..
...तेव्हाच ठरवलं कॅन्सर फायटरसाठी काम करायचं..कॅन्सर अवेअरनेससाठी काम सुरू केलं. घर, मुलं, बिझनेस, स्वतःची तब्येत, आणि अवेअरनेसच काम सगळं मॅनेज करता करता कधी नाकी नऊ सुद्धा येतात. पण पेशंटच्या चेहऱ्यावरचं टेन्शन जाऊन आनंद दिसतो तेव्हा भरून पावल्यासारखं वाटतं.
माझं व्हॉट्सअप स्टेटस बघून बरेच लोकांचे मला फोन येतात. ‘‘तू कर्करोग सहन केला आहेस, ना? कर्करोग पेशंटसाठी काम करायचं तुला काही गरज आहे का?’’ वगैरे वगैरे. आता या लोकांना कसं सांगू, आयुष्यात आपल्या अनुभवाचा फायदा कुणाला होत असेल तर यासारखा दुसरा आनंद नाही. असाच एका कॅन्सर अवेअरनेसच्या कार्यक्रमानंतर स्टॅंडिंग ओव्हेशन मिळालं. प्रेक्षकांनी खूप ॲप्रिसिएट केलं. प्रेक्षकांमधून दोन-तीन जण स्टेजवर येऊन म्हणाले, ‘‘तुमचं काम खूप महत्त्वाचं आहे. समाजाला याची गरज आहे.’’ असे अभिप्राय येतात, तेव्हा कामाचं चीज झालं असं वाटतं.
माझ्या कॅन्सर जर्नीच्या अनुभवावर मी पुस्तक लिहिलं, ‘ब्युटी ऑफ लाईफ’. दोन दिवसांपूर्वी रात्री अडीच वाजता फोन वाजला. अचानक दचकून मी तो हातात घेतला, तर अनोळखी नंबर होता.फोन उचलला, समोरून मला ‘‘आशा नेगी बोलताय का?’’ असं विचारण्यात आलं..
बराच वेळा कॅन्सर पेशंटचे फोन आले, की ते खूप डिप्रेशनमध्ये असतात किंवा त्यांचा आवाज रडकुंडीला आलेला असतो. समोरची व्यक्ती इतकी आनंदात बोलत होती. ‘‘मॅडम, मी आत्ताच तुमचं ‘ब्युटी ऑफ लाईफ’ पुस्तक वाचलं आणि लगेच तुम्हाला फोन केला. माझ्या घरामध्ये गेल्या तीन वर्षांत चार जण कॅन्सरनं गेले आहेत.
मला नेहमीच भीती वाटायची, की मलाही कॅन्सर होणार. माझं वय आता ७१ आहे. माझ्या एका मैत्रिणीनं मला तुमचं पुस्तक सुचवलं, सुरुवातीला वाचायला घाबरत होते... पण वाचल्यानंतर वाटलं, की मला कॅन्सर होणारच नाही..आणि झाला, तरी मी ट्रीटमेंट घेऊन शंभर टक्के बरी होणार..’’
रात्रीचे अडीच वाजलेले, मी साखरझोपेत... त्यात असा अभिप्राय ऐकून मी थोडावेळ सुन्न झाले. काय व्यक्त व्हावं, काय बोलावं कळालंच नाही. त्याच्यासाठीच केला होता हा सगळा अट्टाहास हा विचार मनात आला.. आणि आपण खरंच गरजेच्या ठिकाणी काम करतोय याच समाधान देऊन गेला..
कॅन्सर फायटरना आणि सगळ्यांना एकच सांगेन, ‘कॅन्सर’ म्हणजे आयुष्य ‘कॅन्सल’ नव्हे हे लक्षात ठेवा. जिथं सगळं संपलं असं वाटतं, तिथून आयुष्याची खरी नवीन सुरुवात झालेली असते...