सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही
नवी मुंबई : खारघर येथील उत्सव चौक परिसरात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत एका इसमाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीस्वाराला मागून येणाऱ्या वाहनाने कट मारल्याने हा वाद उफाळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दुचाकीवरील इसमाने वाहनचालकाच्या डोक्यात हेल्मेट मारत त्याला मारहाण केली.सदर घटनेनंतर जखमी इसम खारघर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यासाठी गेला असता तेथेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. शिवकुमार शर्मा असं मयत इसमाचं नाव आहे. खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
अंबरनाथमध्ये विवाहित महिलेची हत्या
दरम्यान, च्या बारकूपाडा भोईर चाळ परिसरात शेजारी राहणारे सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांची मैत्री होती. सीमाचा नवरा तिला सोडून गेल्याने ती १३ वर्षांच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. बेबी सिटिंगमध्ये काम करणाऱ्या सीमाने राहुल याच्याशी असलेल्या मैत्रीतून त्याला अडीच लाख रुपये उसने दिले होते. मात्र, ते पैसे तो परत करू शकत नसल्याने तिने माझ्याशी लग्न कर किंवा माझे पैसे परत कर, असा तगादा लावला होता. तसेच लग्न केले नाही तर बलात्काराची केस करण्याची धमकी तिने राहुलला दिली होती. या दुहेरी कात्रीत सापडलेल्या राहुलने अखेर सीमाचा काटा काढायचे ठरवले.
सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरातील साईबाबा मंदिराशेजारच्या पायऱ्यांवर तो आज दुपारी भेटला. तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि राहुलने सीमावर चाकूने सपासप अनेक वार करत तिथून पळ काढला. यानंतर तो स्वतः जाऊन पोलिसांसमोर हजर झाला, असं सांगितले जातंय. दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेतील सीमाला लोकांनी उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं, मात्र तिचा तिथे मृत्यू झाला. सीमाच्या पोटावर, ओटीपोटाकर, मांडीवर आणि मुख्य म्हणजे छातीवर वर्मी घाव करण्यात आलेत. यामुळे ती वाचू शकली नाही. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाक धाव घेत पंचनामा सुरू केला, तर दुसरीकडे राहुल भिंगारकर याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केलीये. या संपूर्ण घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे.