सोलापूर - बॉम्बे नर्सिंग ॲक्टमधील तरतुदीनुसार कोणत्याही खासगी रुग्णालयास मृत रुग्णाचा मृतदेह बिल दिले नाही म्हणून अडवून ठेवता येत नाही. तरीदेखील, कायद्यातील तरतुदी पायदळी तुडवून बिलासाठी मृतदेह अडविणाऱ्या रुग्णालयांना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.
राज्यातील १९ हजार ३८८ नर्सिंग होमची पडताळणी झाल्यावर त्यातील दोन हजार ९३६ रुग्णालयांनी नियमांचे पालन केले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यांना आता एका महिन्यात नोटिशीवर खुलासा द्यावा लागणार आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील खासगी रुग्णालये कायद्याचे पालन करतात की नाहीत, यासंदर्भातील तपासणी करून एक महिन्यात अहवाल मागविला होता.
त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी व महापालिकेतील वैद्यकीय आरोग्याधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांची तपासणी केली. ५ जानेवारीपासून ही तपासणी सुरु असून त्याचा अहवाल सोमवारी आरोग्य मंत्र्यांकडे सोपविण्यात आला आहे.
नर्सिंग होमची स्थिती
२४,४०० - एकूण अंदाजे रुग्णालये
१९,३८८ - आतापर्यंत तपासणी
२,९३६ - त्रुटी आढळलेली रुग्णालये
१ महिना - त्रुटी पूर्ततेसाठी कालावधी