Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहप्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या संबंधित खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असूनही त्यांनी या बैठकीला दांडी मारली होती. या बैठकीला अजित पवारांची उपस्थिती होती. पण एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान उदय सामंत यांनी शिंदेंच्या गैरहजेरीचे कारण स्पष्ट केले.
उदय सामंत म्हणाले, 'एकनाथ शिंदे संवेदनशील आहेत. ते काही वैयक्तिक कारणांमुळे राहू शकले नाहीत. याचे विरोधकांनी राजकीय भांडवल करु नये. चर्चा सूत्रांच्या माध्यमातून होत आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक झाली. महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. शिवसेनेच्या इतिहासात त्यांच्या नेतृत्त्वात इतका मोठा विजय मिळाला.'
'उपमुख्यमंत्री फार मोठ्या मनाचे आहेत. ते नाराज होऊ शकत नाही. शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ते वैयक्तिक कारणांमुळे आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. तेव्हा याचे भांडवल करु नये' असे वक्तव्य करत यांनी महायुतीत सगळं अलबेल असल्याचे संकेत दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात राहायला का जात नाही? वर्षा बंगल्यावर काळी जादू झाली आहे का? असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. त्यावरही सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. 'सकाळी नऊ वाजताची मुलाखत घेणं बंद करा तर ती काळी जादू पण बंद होईल. ज्या वर्षा बंगल्याने मागच्या अडीच वर्षात लाखो लोक बघितले. जो वर्षा बंगला स्वत:साठी वापरला जायचा तो जनतेला बघता आला नाही, तो शिंदेच्या नेतृत्वात असताना जनतेला बघायला मिळाला. थोडं मेन्टेनन्सचं काम सुरु असेल, तर त्यावरुन राजकीय आरोप करण्याची गरज नाही', असे सामंत म्हणाले.