नवी दिल्ली : आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. सत्तांतर होणार की, सत्ता टिकविण्यात ‘आप’ला यश येणार, याचा निर्णय मतदार घेणार आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा, रोड शो घेत तसेच घरोघरी संपर्क साधत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यमुनेचे ‘विषारी’ पाणी, मतदारांची दिशाभूल असे मुद्दे प्रचारात गाजले. विधानसभेच्या ७० जागांसाठी येत्या पाच तारखेला मतदान होत असून आठ तारखेला मतमोजणी होणार आहे.
भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, प्रवेश वर्मा यांच्यासह सर्व प्रमुख नेते तर ‘आप’कडून मुख्यमंत्री आतिशी, अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, मनीष सिसोदिया आदींनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. काँग्रेसतर्फे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रचार केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही सर्व पक्षांच्या नेत्यांनी पदयात्रा आणि सभांद्वारे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आतिशी यांच्या प्रचारासाठी कालकाजी येथे रोड शो काढण्यात आला. दुसरीकडे छतरपूर येथे केजरीवाल यांची जाहीर सभा झाली. जंगपूरा येथे मनीष सिसोदिया यांच्या समर्थनार्थ बाईक रॅली काढण्यात आली. भगवंत मान, खा. संजय सिंह यांच्या ठिकठिकाणी सभा झाल्या. भाजपच्या वतीने जे. पी. नड्डा यांनी बुराडी येथे जाहीर सभा झाली. राजनाथ सिंह यांनी छतरपूर आणि मोती नगर येथे रोड शो केला. कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी कोटला मुबारकपूर येथे रोड शो केला.
‘तालकटोरा’चे नाव बदलू : भाजपदिल्लीत भाजपचे सरकार आले तर तालकटोरा स्टेडियमचे नाव बदलून ‘महर्षी वाल्मिकी स्टेडियम’ असे केले जाईल, अशी घोषणा नवी दिल्ली मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी केली आहे. दिल्लीत तालकटोरा नावाचे स्टेडियम जिथे आहे, तिथे मुघल काळात कटोऱ्याच्या आकाराचा तलाव होता. त्यामुळे या भागाला तालकटोरा असे म्हटले जाऊ लागले. मात्र आमचे सरकार सत्तेत आले तर स्टेडियमचे नाव बदलून टाकू, असे आश्वासन वर्मा यांनी दिले.
‘रोहिंग्यांना आपचे पाठबळ’आम आदमी पक्षाचे लोक मतांसाठी दिल्लीत बांगलादेशी आणि रोहिंग्यांना वसवत आहेत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला. पात्रा म्हणाले की, घुसखोर लोक कमी पैशांत काम करीत असल्यामुळे पूर्वांचल तसेच इतर राज्यांतील लोकांचे रोजगार झपाट्याने कमी होत आहेत. घुसखोरांना बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्र काढून देण्याचे काम ‘आप’वाले करीत आहेत. दलाल आणि धार्मिक प्रचारकांकडून घुसखोरांना पद्धतशीरपणे वसवले जात असल्याची बाब समोर आली आहे. देशाच्या सुरक्षेला यामुळे धोका निर्माण झाला आहे.
‘नदी स्वच्छतेचे पैसे कोठे गेले?’आम आदमी पक्षात एकाकी पडलेल्या खासदार स्वाती मालिवाल यांनी यमुना नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित करीत नदी स्वच्छतेचे ७५०० हजार कोटी रुपये कोठे गेले?, असा सवाल उपस्थित केला आहे. काही महिलांना सोबत घेत मालिवाल यांनी सोमवारी केजरीवाल यांच्या घरावर मोर्चा काढला. यावेळी केजरीवाल यांना भेट देण्यासाठी महिलांनी यमुना नदीचे पाणी सोबत आणले होते. ‘‘केजरीवाल यांनी नदीचे नाल्यात रूपांतर केले आहे. नदीकिनारी इतका वास येतो की त्याठिकाणी कोणी उभे राहू देखील शकत नाही. यमुना नदी व्हेंटिलेटरवर आहे. ‘शीशमहल’मध्ये राहणारे केजरीवाल कधी भानावर येणार का?,’’ असा प्रश्नही मालिवाल यांनी उपस्थित केला.
मतांमध्ये हेराफेरी शक्य : केजरीवाल‘आप’ नेते अरविंद केजरीवाल यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गडबड केली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सुमारे दहा टक्के मतांची हेराफेरी केली जाऊ शकते, असे सांगून ते म्हणाले, ‘‘हेराफेरी रोखण्यासाठी आम आदमी पक्षाने एक संकेतस्थळ तयार केले आहे. प्रत्येक बूथवरील डेटा या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केला जाणार आहे. दिल्लीकरांनी आम्हाला भरभरून मते द्यावीत. तसे झाले तर दहा टक्के मतांची हेराफेरी होऊनही आम आदमी पक्ष सहजपणे निवडून येईल.’’