डॉ. मृदुल देशपांडे - MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
इन्शुलिन रेझिस्टन्स हा शरीरातील एक महत्त्वाचा आरोग्यविषयक विकार आहे- जो मेटाबॉलिक सिंड्रोम (लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह, उच्चरक्तदाब, हाय कोलेस्टेरॉ) आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक आजारांचे मूळ कारण ठरतो. इन्शुलिन हा स्वादुपिंडामधून स्रवणारा हार्मोन आहे जो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. इन्शुलिन हा एक ‘स्टोरेज’ हार्मोन आहे. आपण अन्नग्रहण करतो, तेव्हा शरीरात कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते, इन्शुलिन हा ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचवण्याचे काम करतो- जेणेकरून ऊर्जा निर्माण होऊ शकेल.
अतिरिक्त कार्बोदके सेवन केल्याने ग्लुकोज ‘स्टोअर’ होते ते ‘फॅट’ म्हणून! जसे आपण पाहिले, अन्न ग्रहण केले, की इन्शुलिन स्रवले जाते आणि शरीरात आलेले ग्लुकोज हे पेशींना ऊर्जेसाठी पाठवले जाते. मात्र, पेशी इन्शुलिनच्या कार्याला प्रतिसाद देण्यात कमी पडतात, तेव्हा पॅन्क्रियाला अधिक प्रमाणात इन्शुलिन तयार करावे लागते, ज्यामुळे रक्तात इन्शुलिनचे प्रमाण सतत जास्त राहते, त्याला इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. सुरुवातीला शरीर हा ताण सहन करू शकते; पण हळूहळू ही स्थिती मेटाबॉलिक समस्यांकडे नेऊ शकते.
कारणेयोग्य आहार : रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, धान्यांचे अतिरिक्त सेवन (Overconsumption of Grains) आणि ट्रान्स-फॅट असलेल्या (तळलेले व पॅकेज्ड फूड) पदार्थांचे नियमित सेवन.
शारीरिक निष्क्रियता : कमी हालचाल किंवा व्यायामाचा अभाव.
लठ्ठपणा : विशेषतः पोटाभोवती साचलेली चरबी.
स्ट्रेस : सतत ताणतणावामुळे हार्मोनल असंतुलन होते.
पोटावर चरबी वाढणे
(Waist to Hip ratio वाढणे)
थकवा जाणवणे
दर दोन तासाला भूक लागणे
मानेवर काळसर डाग येणे (Acanthosis Nigricans)
रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल (Triglycerides) वाढणे
इन्शुलिन रेझिस्टन्स टाइप 2 डायबेटीस, हृदयविकार, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) आणि अल्झायमर (टाईप ३ डायबिटीज म्हणून म्हटले जातं) यांसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देते.
उपाय
आहारात बदल : कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करणे (एका जेवणाला एकच धान्य असावे), रिफाइंड कार्बोहायड्रेटस तर पूर्णतः बंद करणे, जास्त प्रोटिन्स घेणे (ॲनिमल प्रोटिन्सचा समावेश करावा - पनीर, अंडी, चिकन इत्यादी) आणि हेल्दी फॅट्सचा समावेश असलेला आहार घ्यावा.
व्यायाम : आठवड्यातून ३ वेळा वेट ट्रेनिंग व कार्डिओ यांचा समावेश करा.
ताणतणाव व्यवस्थापन : मेडिटेशन आणि योगाचा सराव करा, जर्नलिंग करा.
झोप : पुरेशी आणि नियमित झोप घेणे आवश्यक आहे.
इन्शुलिन रेझिस्टन्सवर औषध नाही. हा जीवनशैलीजन्य आजार आहे. आपल्या ब्लड इन्शुलिन लेव्हल्स पाहण्यासाठी ‘Fasting Insulin’ ही टेस्ट करावी लागते. यावरून तुम्हाला कळेल, की तुम्ही इन्शुलिन रेझिस्टंट आहात की नाही. हा विकार फक्त आहारातील कर्बोदकांचे प्रमाण कमी केल्यानेच सुधारता येणारा आहे. वेळेत योग्य पावले उचलल्यास यावर नियंत्रण ठेवता येते आणि गंभीर आजारांना दूर ठेवता येते.