इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर असून ६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी होत असल्याने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. इंग्लंडने यापूर्वीच भारताविरूद्धची टी२० मालिका ४-१ अशी फरकाने गमावली आहे.
यानंतर आता इंग्लंडला भारताविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. अशातच आता इंग्लंडला एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॅमी स्मिथ या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून बाहेर झाला आहे.
टेलिग्राफ स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार पोटरीच्या दुखापतीमुळे स्मिथ पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. त्याने नुकतेच भारताविरूद्धच्या टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो जेकॉब बेथेलच्या जागेवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टी२० सामन्यात खेळला होता.
त्याने दोन सामन्यात २८ धावा केल्या. त्यानंतर मात्र तो चौथ्या आणि पाचव्या सामन्यात खेळला नव्हता. तो सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रलियाविरुद्ध वनडे मालिकेत जॉस बटलरच्या अनुपस्थितीत खेळला होता.
दरम्यान, कर्णधार त्याच्या पोटरीच्या दुखापतीतून परतल्यानंतर अद्याप यष्टीरक्षण केलेलं नाही. त्यामुळे तो भारताविरुद्ध वनडे मालिकेत यष्टीरक्षण करणार की नाही, हे पाहावे लागणार आहे.
सध्या यष्टीरक्षक फलंदाज म्हणून बटलरसह फिल सॉल्टचा पर्याय आहे. सॉल्टने आत्तापर्यंत यष्टीरक्षक म्हणून तीनच वनडे सामने खेळले आहेत. त्यामुळे आता वनडे मालिकेत यष्टीरक्षणाची जबाबदारी कोण सांभाळणार हे पाहावे लागणार आहे.
याशिवाय काही मिडिया रिपोर्ट्सनुसार नागपूरला होणाऱ्या भारताविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात साकीब मेहमूद इंग्लंडकडून खेळणार आहे. वेगवान गोलंदाज असलेल्या मेहमूदने ९ वनडेत आत्तापर्यंत १४ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर लेग स्पिनर रेहान अहमद यालाही इंग्लंड संघासोबत कायम राहण्यास सध्या सांगण्यात आले आहे. तो आधी भारताविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड संघाचा भाग नव्हता. त्यामुळे तो टी२० मालिकेनंतर घरी परतणार होता. परंतु, त्याला सध्या भारतातच थांबण्यास सांगण्यात आले आहे.
सध्या इंग्लंड संघात आदिल राशिद हा एकमेव फिरकीपटू आहे. तसेच लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकॉब बेथेल हे अष्टपैलू खेळाडूही फिरकी गोलंदाजी करतात.
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड संघ -जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बॅथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हर्टन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड