Beed Crime: वाळू तस्करांसोबत मिलीभगत, निलंबनाच्या कारवाईनंतर पोलिस कर्मचारी बेपत्ता; बीडमध्ये नेमकं चाललंय काय?
Saam TV February 04, 2025 09:45 PM

बीड : वाळूचे ट्रॅक्टर पकडून कारवाई न करता सोडून दिल्याचा ठपका ठेवत बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी निलंबित केले होते. मात्र, यातील एक कर्मचारी अशोक हंबर्डे हे तिन दिवसापासून बेपत्ता आहेत. त्यांचा फोनही बंद असल्याने कुटुंबीय हवालदिल झालं आहे.

तर दुसरीकडे, ठाण्याचे पीआय प्रविणकुमार बांगर यांनी आपली नियंत्रण कक्षात बदली करावी अशा प्रकारचा अर्ज एसपी काँवत यांना दिला आहे. गेवराई ठाण्यातील पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे आणि सहायक फौजदार बलराम सुतार यांच्यावर वाळूच्या पकडलेल्या ट्रॅक्टवर कारवाईत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवला गेला होता. यावरुन दोघांना शुक्रवारी निलंबित केले होते.

दरम्यान, हंबर्डे यांना एक दिवस आधीच पोलीस अधीक्षक यांनी चांगल्या कामासाठी रिवॉर्ड दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे निलंबन झाले. ज्या कारवाईसाठी हे निलंबन झाले त्यातील वस्तूस्थिती आणि पोलीस अधीक्षकांना दिलेला अहवाल यात फरक असल्याचे सांगितले.

दरम्यान, मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर नवे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी संपूर्ण प्रकरणाची सूत्रे हाती घेत अवैध वाळू उपसा करणाऱ्या विरोधात काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई केली होती. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.