छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'मुरांबा' प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेचा टीआरपी देखील चांगला आहे. मालिकेतील रमा आणि अक्षय दोघेही चाहत्यांचे लाडके आहेत. मात्र गेल्या महिन्याभरात मालिकेत एक अनपेक्षित ट्विस्ट आला. रमाचा अपघात होऊन ती दरीत पडल्याचं दाखवण्यात आलं. मात्र तिचा जीव वाचतो. तर दुसरीकडे रमाच्या जागी तिच्यासारखी दिसणारी माही मालिकेत दाखवली जातेय. आता या मालिकेत पुन्हा एक ट्विस्ट येणार आहे. या मालिकेत एका अभिनेत्याची एंट्री होणार आहे.
'मुलगी झाली हो' फेम सिद्धार्थ खिरीड हा अभिनेता मालिकेत एंट्री करणार आहे. त्याच्या पात्राचं नाव साईनाथ शेवलकर आहे. साईनाथ हे पात्र अतिशय वेगळे आहे. मुळचा चंद्रपुरचा असणार साईनाथ पर्यटकांना गाड्या पुरवण्याचे काम करतो. पर्यटकांना ताडोबाच्या जंगलात घेऊन जातो. विदर्भीय भाषा बोलतो. तसा शांत स्वभावाचा आहे. कोणाच्या अध्यात मध्यात नसतो. पण कोणी त्याला चुकीचे वाटेल असे बोलले तर अचानक भडकतो.
मरणासन्न अवस्थेत जेव्हा साईनाथला रमा दिसते तेव्हा तो देवदुतासारखा धावून येतो आणि तिचा जीव वाचवतो. साईनाथच्या एण्ट्रीने मालिकेतली रंगत द्विगुणीत होणार आहे. सिद्धार्थ या मालिकेबद्दल बोलताना म्हणाला, ''स्टार प्रवाहसोबत खूप जुने नाते आहे. मुलगी झाली हो मालिकेनंतर जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह परिवारात सामील होण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. या मालिकेच्या निमिताने विदर्भीय भाषा शिकण्याची संधी मिळाली.'
तो म्हणाला, 'ही नवी भाषा आत्मसात करताना माझा कस लागतो आहे. मात्र सेटवर सर्वांच्या मदतीने मी या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे. मालिकेची टीम खूप छान आहे. सेटवर खूप छान पद्धतीने सर्वांनीच मला आपलेसे करुन घेतले आहे.