नॅशनल ब्युरो ऑफ प्लान्टस् जेनेटिक यांच्या अभ्यासानुसार, भारताच्या राष्ट्रीय बियाण्यांच्या बँकेत जमा असलेल्या बियाणांची विविधता थक्क करणारी आहे. यामध्ये भाज्यांच्या २५०८४ प्रजाती आहेत, तर कंदमुळांच्या ८५० प्रजाती आहेत. फळांच्या दीड हजाराच्या वर प्रजाती असून, मसाल्याच्या ३७२१ प्रजाती आहेत. या खेरीज जंगलामधून गोळा केला जाणारा वनोपज २४४३ प्रजातींच्या विविध वनस्पतींपासून मिळवला जातो.
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी सृष्टीज्ञान संस्था
भारतातील आदिम बियाणांच्या अनेक प्रजाती या वन्य वनस्पतींवर शेतकऱ्यांनी प्रयोग करून सुधारित वाण म्हणून तयार केलेल्या आहेत. यात प्रमुख आणि किरकोळ पिकांच्या प्रजातींसोबत त्यांच्या वन्य मूळ वनस्पतींच्या अठरा हजारपेक्षा जास्त प्रजाती आहेत. यातील १५०० खाद्य प्रजातींच्या वनस्पती आदिवासींमध्ये आजही वापरल्या जात आहेत. यामध्ये कंदमुळांच्या १४५ प्रजाती, पाला आणि फळभाज्यांच्या ५२१ प्रजाती, फळांच्या ६४७ प्रजाती आणि सुकामेव्याच्या ११८ प्रजातींचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त, संपूर्ण देशात सण-व्रतवैकल्ये यासारख्या सांस्कृतिक कारणासाठी जवळपास ९५०० वनस्पती प्रजातींचा वापर नोंदवला गेला आहे. त्यापैकी सुमारे ७५०० वनस्पती पारंपरिक औषधे म्हणून वापरल्या जातात, तर ३९०० या बहुउद्देशीय आणि खाद्य वनस्पती आहेत (as per National Academy of Agriculture Science, 1998).)
२०१३ साली झालेल्या गणनेनुसार पुढील पिकांची आदिम बियाणी संग्रहित आहेत.धान्ये प्रजाती
तांदूळ ९५३२६
गहू ४००८६
मका ९४७९
इतर धान्ये १२२७०
आदिमधान्ये
ज्वारी २०४३२
बाजरी ८३९५
छोटी आदिमधान्ये (नाचणी, कोदो, राळा इ.) २२३१६
इतर आदिम धान्ये (कुटकी, वरी, सावा इ.) ५३४४
राजगिरा बी ५५५८
कुट्टू बी ८८०
विविध प्रकारची कडधान्ये आणि डाळी
चणा १६८९८
तूरडाळ ११४२७
मूग ३७०४
उडीद ३५००
इतर कडधान्ये २६१४५
तेलबिया
भूईमूग – शेंगदाणा १४६१०
मोहरी १०६४५
करडई ८०४८
इतर २४१८२
धागा निर्मितीसाठी उपयुक्त वनस्पती
कापूस ६८१५
ताग २९१४
इतर २२१४
आदिम बियाण्यांच्या विशिष्ट प्रजाती आणि त्यांचे प्रमाण याबद्दल तपशीलवार आकडेवारी सहज उपलब्ध होत नाही. आदिम बियाण्यांच्या आकडेवारीचा मागोवा घेण्यात अनेक आव्हाने आहेत. कारण, अजूनही आदिम बियाण्यांच्या दस्तऐवजीकरणाचे काम अजूनही सुरू आहे. संपूर्ण भारतातील सर्व आदिम बियाणांचा सर्वसमावेशक डाटाबेस सहज उपलब्ध नाही तसेच अनेक आदिम बियाणांची लागवड करणारे शेतकरी हे अल्पभूधारक आणि दुर्गम भागात राहणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील आदिम बियाणांची नोंद घेणे कठीण जाते तसेच भौगोलिक विविधतेमुळे एकाच भागात एकाच पिकाच्या अधिक वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती तयार होतात. त्या सर्वांमधील फरक लक्षात घेऊन त्यांची विविध वाण म्हणून नोंद करणे हे खूपच अवघड आणि चिकाटीचे काम आहे.
बीज वैविध्याने समृद्ध भारतीय शेतीमुळे वैविध्यपूर्ण पर्यावरण संवर्धनात महत्वाची भूमिका निभावली आहे. त्याचप्रमाणे अन्नसुरक्षा आणि पोषण सुरक्षा मिळवून देण्यातही पारंपरिक आदिम बियाणांचा मोठा वाटा आहे. भारताची सांस्कृतिक विविधता आणि जैवविविधता यांचे संवर्धन पारंपरिक आदिम बियाण्यांमुळे होत आले आहे. अन्न म्हणून पारंपरिक आदिम बियाण्यांचे महत्त्व जाणून घेऊया पुढच्या भागात.