भंडारा : तुमसर शहरातील इंदिरानगर येथील राजकमल ड्राय क्लीनिंग आर्ट या दुकानात पाच कोटी रुपयांची रोकड सापडल्याप्रकरणी अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकासह दहा जणांना पोलिसांनी अटक केली.
आरोपींनी अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक गौरीशंकर फुलचंद बावनकुळे (वय ४०) यांना ५ कोटी रुपये रोख देण्याच्या मोबदल्यात त्यांना दोन कोटी देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे ७ कोटी रुपये जमा करण्याचे आरोपींनी कबूल केले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी बुधवारी, पत्रपरिषद घेऊन या संपूर्ण घटनेची माहिती दिली.
आरोपी गेल्या काही दिवसांपासून तुमसर शहरातील काही लोकांशी रोख रकमेसाठी संपर्क करत होते. या प्रकरणाची माहिती आरबीआय, आयकर विभाग, ईडी यांना देण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी संबंधित विभागाचे पथक तुमसर येथे तपासणीसाठी पोहोचले, असे हसन यांनी सांगितले..
तुमसर येथील अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक बावनकुळे आणि तालुक्यातील तामसवाडी येथील अॅक्सिस बँकेचे ऑपरेटिंग हेड विशाल तेजराम ठाकरे (२९) यांच्याशी काही दिवसांपूर्वी या टोळीने संपर्क साधला होता. बड्या कंपन्यांना रोख रक्कम हवी आहे, असे सांगून आरोपींनी बँक व्यवस्थापक गौरीशंकर यांना ५ कोटी रुपये रोख देण्याची व त्याबदल्यात आरटीजीएसद्वारे सात कोटी रुपये बँक खात्यात परत देण्याचे आमिष दाखवले. या आमिषापोटी बावनकुळे यांनी मंगळवारी (ता. ४ फेब्रु.) बँकेच्या सुरक्षागृहातून पाच कोटींची रक्कम काढून इंदिरानगर येथील राजकमल ड्राय क्लीनिंग आर्ट या दुकानात परस्पर नेली. यासाठी बँक व्यवस्थापक गौरीशंकर बावनकुळे यांनी ड्राय क्लीनिंग दुकानदार जगदीश शंकरराव काटकर (वय ४८, रा. संत जगनाडे नगर, तुमसर) यांना एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले होते.
दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ड्राय क्लिनिंगच्या दुकानावर छापा टाकून पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या घटनेची माहिती अॅक्सिस बँकेच्या वरिष्ठांना देण्यात आली. सरकारी पंच आणि व्हिडिओ चित्रीकरणात रोख रुपये मोजण्यात आले. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आयकर विभाग आणि ईडीच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी भंडारा येथील अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक अभय मनोज नशीने यांच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी तुमसरचे व्यवस्थापक बावनकुळे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.
गोंदियाच्या एमडी इंडस्ट्रीज आणि अमन स्क्रॅप कंपनीकडून अॅक्सिस बँकेतील आशिष ट्रेडर्स आणि रोहित ट्रेडर्स यांच्या खात्यावर पाच कोटी रुपये जमा झाल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले. उर्वरित दोन कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत बँक व्यवस्थापक व इतर होते. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. या सर्व कंपन्यांशी संबंधित लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे.
दिल्ली आणि उत्तराखंडमधील आरोपींचा समावेशया फसवणुकीच्या प्रकरणात विविध राज्यातील टोळ्यांचा सहभाग असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून हे आरोपी तुमसर शहरातील वेगवेगळ्या लोकांना आमिष दाखवून रोख रकमेची मागणी करत होते. याआधी आरोपींनी तुमसर येथील अभिषेक कारेमोरे यांच्याशी संपर्क साधून ५ कोटींची मागणी केली. पण त्यांनी नकार दिला.
हे आहेत आरोपी
विनित कक्कर (वय ३८, काशीपूर, जि. उधमसिंग नगर, उत्तराखंड)
चंद्रशेखर धाबू (५४, रा. फ्लोर सिटी, रायपूर, छत्तीसगड)
शुभम नागदेवे (३३, रा. भीमनगर, गोंदिया)
मिलिंद रामटेके (३०, रा. शिवनी, जि.गोंदिया)
सागर मुलतानी (वय ३२, रा. भीमनगर, गोंदिया)
राजा खोब्रागडे (३२, रा. गोंदिया)
शुभम रंगारी (३३)
गौरीशंकर बावनकुळे (४०, बँक व्यवस्थापक, रा. विनोबा नगर, तुमसर)
विशाल तेजराम ठाकरे (२९, रा. तामसवाडी, ता. तुमसर)
जगदिश शंकरराव काटकर (४८, रा. संत जगनाडेनगर, तुमसर