टीम इंडियाने 2025 या वर्षातील पहिल्यावहिल्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामन्यात विजयाने सुरुवात केली. भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत इंग्लंडवर 4 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाचा प्रमुख आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याला या सामन्यात दुखापतीमुळे खेळता आलं नाही. विराटला गुडघ्याच्या त्रासामुळे या सामन्याला मुकावं लागलं. विराटच्या या दुखापतीमुळे टीम इंडियाचं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर टेन्शन वाढलंय. उभयसंघातील दुसरा सामना हा रविवारी 9 फेब्रुवारीला होणार आहे. विराट त्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत उपकर्णधार शुबमन गिल याने पहिल्या सामन्यानंतर अपडेट दिली.
विराटच्या अनुपस्थितीत शुबमन गिलने पहिल्या सामन्यात तिसर्या स्थानी बॅटिंग केली. शुबमनने टीम इंडियाकडून सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. शुबमनच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 249 धावांचं आव्हान सहज पूर्ण करता आलं. शुबमनला चा कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारने गौरवण्यात आलं. शुबमनने यानंतर विराट दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत सांगितलं.
“विराट कोहलीच्या गुडघ्याला सूज होती. मात्र चिंता करण्यासारखं काहीच नाही. विराट दुसऱ्या सामन्यापर्यंत फिट होईल” अशी माहित देत शुबमनने विराटच्या दुसऱ्या सामन्यातून कमबॅकबाबतचा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान विराटला दुखापतीमुळे मुकावं लागल्याने त्याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये श्रेयस अय्यर याचा समावेश करण्यात आला. श्रेयसने या संधीचं सोनं केलं. श्रेयसने 2 सिक्स आणि 9 फोरसह 57 रन्स केल्या.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा