PMP Driver : पीएमपी चालक योग्य 'मार्गा'वर; समुपदेशन, प्रशिक्षणामुळे अपघात घटले
esakal February 07, 2025 01:45 PM

- प्रसाद कानडे

पुणे - चालकांचे समुपदेशन, संवाद व प्रशिक्षण, याचे फलित म्हणून ‘पीएमपी’ बस अपघाताला ‘ब्रेक’ लागला आहे. अपघातग्रस्तांचे प्रमाणदेखील लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या वर्षात अपघातांचे प्रमाण ११.१७ टक्के होते, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ मध्ये हे प्रमाण ९.१२ झाले, तर आता हे प्रमाण ४.८ टक्क्यांवर आले आहे. ‘पीएमपी’ प्रशासनाने चालकांना योग्य ‘मार्गावर’ आणल्याने अपघातांचे प्रमाण घटले आहे.

गेल्या काही वर्षांत ‘पीएमपी’चा प्रवास अनेकांना असुरक्षित वाटत होता. महिला प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी, बसचे वाढते अपघात, असे प्रकार वाढतच आहेत. शिवाय चालक अनेकदा वेगाने बस चालवतात. वाहतुकीचे नियम मोडणे हा प्रकार अजूनही सुरू असला तरीही त्याला कारवाईमुळे अंकुश लागला आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. शिवाय चालकांच्या समुपदेशन व प्रशिक्षणावर भर दिल्याने आता अपघातांचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत घटले आहे.

म्हणून घटले अपघात?

प्रशिक्षण : पीएमपीचे स्वचालक व ठेकेदारांचे चालक, अशा दोन्ही प्रकारच्या चालकांना पीएमपीने प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ‘आयडीटीआर’ने यासाठी दोनदिवसीय प्रशिक्षणाचा कालावधी निर्धारित केला. त्यात विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत सुमारे ३०० चालकांना प्रशिक्षण देण्यात आले.

समुपदेशन : पीएमपी प्रशासनाने चालकांचा ताण कमी करण्यासाठी समुपदेशनावर भर दिला. ताणतणाव कशा रीतीने हाताळावा, ताण असतानादेखील बस सुरक्षितपणे कशी चालवावी, अपघात होऊ नये यासाठी काय करावे आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दृष्टिक्षेपात

  • बसची संख्या - २०७२

  • प्रवासी सेवेत - १७६०

  • प्रवासी संख्या - १२ लाख (दैनंदिन)

  • सेवेचे क्षेत्र - ७,२५६ चौ.कि.मी.

  • बसचे मार्ग - ३८५

  • कर्मचारी - ८,५००

  • प्रवासी उत्पन्न (दैनंदिन) - १ कोटी ७० लाख

८८७ चालकांवर कारवाई

पीएमपी प्रशासनाने मागच्या वर्षात वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी ८८७ चालकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे ‘पीएमपी’ प्रशासनाने सांगितले.

पीएमपी प्रशासनाने अपघातमुक्त प्रवासी सेवा देण्यावर भर दिला आहे. त्यानुसार चालकांना प्रशिक्षण दिले जात आहे. शिवाय चालकांचे समुपदेशनदेखील केले जात आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण घटत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत.

- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.