टीम इंडियाने नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने 249 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून 10 पेक्षा अधिक ओव्हर राखून सहज पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. रोहित शर्माला या सामन्यात 2 धावांवर बाद होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. रोहितने अशाप्रकारे वनडेतही फ्लॉप शो कायम ठेवलं. मात्र रोहितने कर्णधार म्हणून खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितने या बाबतीत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला मागे टाकलं आहे. तर रोहितपुढे विराट कोहली आहे.
रोहितचा कर्णधार म्हणून एकूण 49 वा एकदिवसीय सामना ठरला. रोहितने टीम इंडियाला 49 पैकी 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर महेंद्र सिंह धोनी 49 सामन्यांनंतर टीम इंडियाला 30 सामन्यांमध्ये विजयी करण्यात यशस्वी ठरला होता. तर विराट कोहली याने 49 पैकी 38 वनडे मॅचमध्ये टीम इंडियाला विजयी केलं होतं. आता रोहित कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध कर्णधार म्हणून 50 सामना खेळणार आहे.
दरम्यान रोहित शर्माचा टेस्ट, रणजीनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्येही फ्लॉप शो कायम आहे. रोहितला धावांसाठी सातत्याने संघर्ष करावा लागतोय. रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या चाहत्यांची घोर निराशा केली. रोहितला एकाही डावात मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर रोहित रणजी ट्रॉफीत खेळला. रोहितकडून मोठ्या खेळीची आशा होती. पण कसलं काय? रोहित इथेही ढेर झाला. त्यानंतर रोहितकडून एकदिवसीय मालिकेत चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र पहिल्या सामन्यात 2 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे आता रोहितचा चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठी खेळी करुन कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. रोहित या प्रयत्नात किती यशस्वी ठरतो हे लवकरच समजेल.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा.