दिग्दर्शिका सेलिन साँगच्या ‘पास्ट लाइव्ह्ज’ (२०२३) या चित्रपटाची सुरुवात फारच साध्या, परंतु मार्मिक शॉटने होते. अमेरिकेतील एका बारचे काउंटर आपल्याला दिसते. त्या काउंटरच्या डावीकडे तीन लोक बसलेले आहेत - दोन पुरुष आणि त्यांच्या मधे बसलेली एक स्त्री. यापैकी एक पुरुष आणि स्त्री आशियाई वंशाचे आहेत, तर दुसरा पुरुष श्वेतवर्णीय आहे. ते काय बोलत आहेत ते आपल्याला ऐकू येत नाही.
आपल्या कानांवर पडतंय ते एक वेगळंच संभाषण, या तिघांच्या विरुद्ध बाजूला काउंटरच्या उजवीकडे बसलेल्या तिऱ्हाईत व्यक्तींमधील. समोर बसलेल्या तिघांचं एकमेकांशी काय नातं असेल, याविषयीचे हे कुतूहलमिश्रित चहाटळ संभाषण आहे. हे सारं होत असताना शॉट हळूहळू झूम होत राहतो आणि शेवटी मध्यभागी बसलेली स्त्री थेट कॅमेऱ्यात पाहत असताना हा अवघ्या मिनिटभर लांबीचा शॉट संपतो. चित्रपटाची पार्श्वभूमी, त्यातल्या संकल्पना लक्षात आल्यावर त्यचं महत्त्व कळतं.
साँगचा हा पहिलाच चित्रपट बराचसा आत्मचरित्रात्मक आहे. तिची नायिका नोरा (ग्रेटा ली) दिग्दर्शिकेप्रमाणेच मूळची साऊथ कोरियाची असली तरी लहानपणीच कॅनडामध्ये आणि नंतर अमेरिकेत स्थलांतरित झालेली आहे. नोराची व्यक्तिरेखा साँगप्रमाणेच एक नाटककार आहे आणि तिचा ज्यू वंशीय नवरा आर्थर (जॉन मगॅरो) कादंबरीकार असणं, एका पाठ्यवृत्तीच्या निमित्ताने झालेली त्यांची पहिली भेट या गोष्टीदेखील साँगच्या आयुष्यापासून प्रेरित आहेत. इतकेच नव्हे, तर चित्रपटाची संकल्पनादेखील दिग्दर्शिका साँग, तिचा एक मित्र आणि तिचा नवरा यांच्या एका डिनर भेटीपासून प्रेरित आहे!
लहानपणीच साऊथ कोरियामधून स्थलांतरित होणं, त्यानंतर बारा वर्षांनी इंटरनेटमुळे हे संग (तेओ यू) या आपल्या जुन्या मित्राशी संपर्कात येणं, त्याच्यासोबत प्रेमाचे नाते फुलत असतानाच स्वतःच्या महत्त्वाकांक्षांमुळे ते बाजूला सारणं आणि पुन्हा बारा वर्षांनी तो न्यू यॉर्कमध्ये आल्यानंतर त्याला भेटणं असा हा प्रवास.
दिग्दर्शिका साँगच्या या पहिल्याच चित्रपटात संयत, तरीही आत्मविश्वास असलेली दिग्दर्शकीय हाताळणी पाहायला मिळते. सेऊल आणि न्यू यॉर्क या दोन शहरांत एके अर्थी दोन दगडांवर पाय रोवून असलेली नायिका दाखवताना साँगदेखील दोन्ही शहरं फारच रोचकरीत्या चितारते. एके ठिकाणी नोराचं पात्र म्हणतं की, भेटायला आलेला मित्र हा तिच्याहून कैकपटींनी अधिक साऊथ कोरियन आहे. अर्थात तिची मुळं त्या देशातली असूनही ती कॅनडा आणि अमेरिका इथे राहून आपल्याच संस्कृतीपासून दूर जाऊन काहीशी तिऱ्हाईत बनली आहे.
तिच्या दृष्टीने वर्तमान व भूतकाळाचा संबंधही असाच गुंतागुंतीचा बनला आहे. चित्रपटात पुढे येणाऱ्या बार काउंटरवरील प्रसंगांमध्ये दिसते त्यानुसार तिच्या डावीकडे तिचा अमेरिकन नवरा आहे, तर तिच्या उजवीकडे तिचा साऊथ कोरियन मित्र आहे. दोघांना एकमेकांच्या भाषा फारशा येत नाहीत. जुजबी शब्द नि वाक्प्रचार तितके समजतात. त्या दोघांमधील बोलणं भाषांतरित करणारी नोरा केवळ दोन माणसं किंवा संस्कृतींमधील दुवा बनून राहत नाही, तर त्यात भूत व वर्तमान यांमधील स्वतःच्याच दोन आवृत्त्यांमधील सुसंवादही आहे.
हा सारा सहसंबंध दिग्दर्शिका साँगच्या चित्रपटाला प्रचंड गुंतागुंतीचं आणि प्रभावी बनवतो. तिच्या चित्रपटात संवाद फारच मोजके आहेत. पात्रं शब्दांतून जितके व्यक्त होतात तितकीच शारीरिक हावभाव आणि शांत क्षणांतून व्यक्त होतात. तिची ही प्रेमाविषयीची कथा फारच नाजूक, दृश्यरीत्या नेटकी आणि प्रचंड थेट आहे.
सिनेमात नोराचा मित्र हे म्हणतो त्याप्रमाणे ती जशी आहे तशी असल्यानेच ती त्याला आवडते. आणि ती कोण आहे, तर ती गोष्टी मागे सोडून जाणाऱ्यांतली आहे. आपला देश, आपली संस्कृती, आपला प्रिय मित्र असं बरंच काही मागे सोडून जाणारी. ‘पास्ट लाइव्ह्ज’ ही सोडून जाणाऱ्यांची गोष्ट आहे आणि मागे राहिलेल्यांचीही गोष्ट आहे. त्यामुळेच ती शंभरातील नव्व्याण्णवांची गोष्ट आहे.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)