रखमाने दिला जगण्याचा आत्मविश्वास अन् अभिमान
esakal February 09, 2025 08:45 AM

पाच दशकांहून अधिक वर्षांच्या कारकीर्दीत मी अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. त्या सगळ्याच मला जिव्हाळ्याच्या वाटतात. मात्र जर मला कोणत्या एका भूमिकेचं वेगळेपण सांगायचं असेल तर ‘झुंज’ हे नाटक नक्कीच विशेष ठरेल. हे नाटक मधुकर तोरडमल यांनी लिहिलं आणि दिग्दर्शन केलं होतं. त्यात मला ‘रखमा’ ही भूमिका साकारायची संधी मिळाली आणि ती आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा सर्वस्वी वेगळी होती.

रखमा ही महिला सफाई कर्मचारी होती आणि या भूमिकेसाठी माझा संपूर्ण लूक बदलण्यात आला. तिचा लहेजा, राहणीमान सगळंच वेगळं होतं. खरं सांगायचं तर मी ही भूमिका स्वतःहून मागून घेतली. त्यानंतर या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी मी काही दिवस मेहनत घेतली. त्यासाठी वस्तीत जाऊन एका सफाई कर्मचारी महिलेच्या घरी राहिले. तिचं वागणं, बोलणं, उठणं, बसणं, पदर सावरणं या सगळ्या गोष्टी मी आत्मसात केल्या. प्रयोगाच्या आधी रोज दीड तास मेकअप करावा लागायचा. या भूमिकेद्वारे मला त्या महिलांचा संघर्ष, त्यांची जिद्द प्रेक्षकांसमोर आणायची होती. या भूमिकेने मला जगण्याचा आत्मविश्वास आणि अभिमान दिला.

दुसरं नाटक म्हणजे ‘चारचौघी.’ हे नाटक प्रशांत दळवी यांनी खूप सुंदर पद्धतीनं लिहिलं आहे. खरंतर आतापर्यंत मी ज्या ज्या भूमिका केल्या त्या मला आवडल्या म्हणूनच केल्या. सर्वप्रथम मी माझी भूमिका काय आहे ते पाहते आणि ती भूमिका मला आवडली की त्यानंतर माझ्या नवऱ्याला ती भूमिका ऐकविते. त्यानंतर ती स्वीकारते. परंतु ‘चारचौघी’ हे एकमेव नाटक आहे. जे मी माझ्या नवऱ्याला ऐकवलं नाही. कारण हे नाटक काळाच्या पुढचं होतं. रूढीप्रिय लोकांना ही भूमिका जड जाण्याची शक्यता होती. त्यामुळे माझ्या पतीचा नकार येऊ नये, म्हणून मी तो विचार मनातही आणला नाही.

मला ती भूमिका करायचीच होती, म्हणून मी स्वतःच निर्णय घेतला. त्यात एक वीस मिनिटांचा मोनोलॉग होता. माझ्या समकालीन अभिनेत्रींनादेखील ही भूमिका विचारली होती; पण त्यांना ती खूप आव्हानात्मक वाटली आणि त्यांनी नकार दिला. मात्र मला वाटलं की चॅलेंजिंग आहे तर ते स्वीकारायलाच हवं. लेखकाने संवाद जड शब्दांत लिहिले होते. पण ते सहज आणि परिणामकारक कसे करता येतील, याकडे माझं लक्ष होतं. ‘चारचौघी’ नाटक गाजलं आणि त्याचे हजारहून अधिक प्रयोग झाले. आजही लोक माझ्या भूमिकेची आठवण काढतात.

तिसरं विशेष नाटक म्हणजे ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला.’ हे नाटक स्वरा मोकाशीने लिहिलं होतं आणि चंद्रकांत कुलकर्णीने दिग्दर्शन केलं होतं. या भूमिकेसाठी मी अक्षरशः वर्षानुवर्षे वाट पाहत होते. ती इतकी ताकदीची होती की लोक या पात्रासाठी येऊन पाया पडायचे.

त्यानंतर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ हे नाटक. यात मी एक व्यावसायिक चेटकीण साकारली होती. कोलकात्यात बसून जादू करणारी ही स्त्री अशी व्यक्ती होती, जिला कोणीही सहज जाऊन भिडायचं धाडस करणार नाही. ती एका पत्रकाराच्या कुटुंबाला वश करण्याचा प्रयत्न करते, पण शेवटी अयशस्वी होते. यात माझा एक साथीदार होता - बाबू. आणि त्या चेटकिणीची हाक मारायची एक विशिष्ट पद्धत होती - ‘बाबू!’ प्रयोगादरम्यान, मी त्या पात्राच्या रूपात हाक मारली की प्रेक्षकांमधूनही प्रतिसाद मिळायचा - ‘बाबू!’ हे अनुभवणं खूप खास होतं.

माझ्या कारकीर्दीची सुरुवात १९७० साली ‘पद्मश्री धुंडिराज’ या नाटकाने झाली. हे नाटक मंगला संझगिरी यांनी लिहिलं होतं आणि सर्व स्त्रियांचं त्यात योगदान होतं. आणि त्यात मला एक खोडकर, मिश्कील अशा मुलीची भूमिका मिळाली. मला विचारण्यात आलं, ‘‘तू करशील का?’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘प्रयत्न करेन!’’ तेव्हापासूनच मला आव्हानं स्वीकारायची सवय लागली. ऑडिशनच्या वेळी समोर दामू केंकरे, विजया मेहता, विजय तेंडुलकर, मधुकर तोरडमल अशा दिग्गजांची उपस्थिती होती. माझा पहिला नंबर होता. त्यांनी मला स्क्रिप्ट वाचायला सांगितली. पहिलाच संवाद होता - ‘‘ए हाय!’’ मग मी त्यांना विचारलं, ‘‘हे आपण कॉलेजमध्ये म्हणतो ते हाय आहे की काही तुम्ही म्हणता ते हाय?’’ त्यावर दामू सर हसून म्हणाले, ‘‘आम्ही तुला या नाटकात घेतोय!’’ कारण त्यांना अशीच खोडकर आणि मिश्कील मुलगी हवी होती.

माझ्या आतापर्यंतच्या रंगभूमीवरील प्रवासात मी बारा हजार प्रयोग केले आहेत. माझे घर आणि रंगभूमी असे दोन्ही सांभाळले. वेळेचं नियोजन, जबाबदाऱ्या पेलणं, प्रेक्षकांशी नाळ जोडणं या सगळ्या गोष्टी शिकले. बालगंधर्व का म्हणायचे की ‘प्रेक्षक हे मायबाप असतात,’ हे मला अनुभवातून उमगलं. आज मागे वळून पाहताना मला अभिमान वाटतो की, मी हा प्रवास केला.

(शब्दांकन : संतोष भिंगार्डे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.