प्रेमकहाणी व संगीताची जादू
esakal February 09, 2025 08:45 AM

कलकत्ता बंगालच्या उपसागराला मिळणारी गंगा, हिमालयाचे ‘कांचन’गंगा शिखर, भारतीय, युरोपीय जीवनशैलीच्या खुणा, वास्तू, प्रासाद, क्रांतिकारक, कवी, लेखक, संत यांच्या वास्तव्याची भूमी असं वर्णन अपुरं पडेल असे शहर - स्वप्नांचे शहर होते. १० फेब्रुवारी १९३० या दिवशी वीरेंद्रनाथ सरकार या युवकाने ‘न्यू थिएटर्स’ हा भव्य सुसज्ज स्टुडिओ उभा केला. बंगालचे ॲडव्होकेट जनरल असलेल्या उच्चपदस्थ पित्याचा हा मुलगा लंडनच्या ‘सिटी अँड गिल्ड्स’मधून स्थापत्याची पदवी घेऊन भारतात परतला होता. परदेशातील सिनेमा आणि बंगाल रंगभूमीचा निस्सीम चाहता होता. आधुनिक सिनेमा हा एक तऱ्हेचं नाटकीय आविष्काराचं रूप वाटल्याने त्यांनी ‘न्यू थिएटर्स’ हे सार्थक ठरणारे नाव दिले होते. पुढे या संस्थेनं इतिहास घडवला.

सिनेमा हा जणू भारतीयांच्या नित्य सोहळे साजरे करणाऱ्या त्यांच्या जीवनाचा एक उत्सव झाला. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, पोषाखी, धार्मिक चित्रपटांची नुसती गर्दी उसळली होती. कलकत्त्याच्या समृद्ध भावजीवनात बी. एन. सरकार यांनी ‘न्यू थिएटर्स’चा भव्य स्टुडिओ उभा करून एक सुंदर पटकथा लिहिली. पडद्यावर वंगकन्या सुहासिनी, सुमधुर भाषिणी गाऊ लागल्या, तर सैगल नावाचा अमर स्वर भारतीयांना साद घालू लागला. ‘एक बंगला बने न्यारा...’

प्रेमांकुर अटॉर्थी दिग्दर्शित ‘देना पाओना’, ‘मुहब्बत के आसूं’, ‘सुबह का सितारा’, ‘जिंदा लाश’, ‘यहुदी की बेटी’ हे अयशस्वी झाल्यानंतर बी. एन. सरकार यांनी बंगालच्या समृद्ध साहित्याकडे मोर्चा वळवला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना राजी करून न्यू थिएटर्समध्ये आणलं आणि त्यांची नृत्य नाटिका ‘नटीर पूजा’ याचे चित्रीकरणही केलं. १९३२ साली गुरुदेवांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नटीर पूजा’ची प्रिंट शांतिनिकेतनमध्ये जतन केलेली आहे, मात्र ‘चंडीदास’ बंगालीत व नंतर हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रसिक मनाची पकड घेतली.

मूकपट करणाऱ्या देवकीकुमार बोस यांनी पहिल्यांदाच बोलपटाचे दिग्दर्शन केले. पंधराव्या शतकातील संत कवी चंडीदास आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीची युवती यांची प्रेमकथा सर्वांचे मन हेलावून गेली. ‘प्रेमनगर में बनाउंगी घर मैं तज के सब संसार’ उमाशशी आणि सैगलने अभिनय केला आणि गायलंही! तो काळ सिंगिंग स्टार्सचा होता. अजून प्लेबॅक म्हणजे पार्श्वगायन थोडे दूर होते, पण संगीत श्रवणाची मोठी पर्वणी तंत्रज्ञानाने खुली करून दिली होती.

२३ जुलै १९२७ रोजी कलकत्ता आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या खासगी संस्था उघडल्या होत्या. शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीताच्या ध्वनिमुद्रिका निघत होत्या, पण नवीन शब्दप्रधान, सुगम शास्त्राच्या व्याकरणाचा बडिवार नसलेलं तीन-साडेतीन मिनिटांचं गाणं तबकडीवर अवतरलं. बंगालमध्ये आधुनिक गान तर महाराष्ट्रात भावगीत म्हणून ते ओळखलं जाऊ लागलं. ग्रामोफोन कंपनीचे अधिकारी आपली यंत्रसामग्री घेऊन देशातील नवे गायक, कवी, संगीतकार यांचा शोध घेऊ लागले तो हाच काळ होता. रेडिओ प्रसारणासाठीही गायक, कवी, संगीतकार यांची गर्दी होऊ लागली. इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आणि ग्रामोफोन कंपनी याचे एक सूत्र कुंदनलाल सैगल यांच्यापाशी जोडलं जातं.

इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये संगीतकार रायचंद बोराल, पंकज मलिक, सचिन देव बर्मन, अनिल विश्वास यांची ऊठबस असे. आज गाण्याची जी रचना प्रचलित आहे, वाद्यवृंद आणि संगीत, स्वर याचा आराखडा आहे त्याचे श्रेय रायचंद बोराल यांना जाते. अशा रायचंद बोराल यांची प्रतीक्षा करणारा एक युवक होता कुंदनलाल सैगल. जम्मूमध्ये जन्मलेल्या सैगलचे कुटुंब नंतर जालंधरला स्थायिक होते. लहानपणी ‘रामलीला’मध्ये सीता झालेले सैगल भैरवी म्हणताच प्रेक्षकांचे डोळे पाणावत असत, पण कोणतेही संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या सैगलना निसर्गदत्त स्वर लाभला होता. हरिश्चंद्र बाली या मित्राने रायचंद बोराल यांची भेट घडवली.

न्यू थिएटर्सच्या ऑडिशन सभागृहात सैगल हजर झाले. खुद्द बी. एन. सरकार, पंकज मलिक, के. सी. डे यांच्या उपस्थितीत सैगलने दोन गाणी म्हटली. बोराल यांनी चाल दिलेली गाणी बंगालीत होती. हार्मोनियम ओढून सैगलने ‘कहारे ते जोडाते चाई’ आणि ‘गोलाप होबे उथक फूटे...’ ती ऐकताच सर्वजण मंत्रमुग्ध झाले. अंध गायक के. सी. डे यांनी सैगलना मिठी मारून म्हटलं, ‘‘आरे पांजाबी, आपनि बांगला बूझते पारिन?’’

भाषेवर प्रभुत्व तर त्यांनी मिळवलेच. पण त्यांची असाधारण उंची आणि अकाली पडलेलं टक्कल या गोष्टी त्यांच्या स्वरांपुढे अडसर ठरल्या नाहीत. रायचंद बोराल, सैगल, सरकार यांची भेट १९३० मधल्या नोव्हेंबरची. तोवर चित्रपट बोलतही नव्हता. आता ग्रामोफोन कंपनीचे एक सैगलपाशी जाणारे सूत्र म्हणजे त्यांची एक ध्वनिमुद्रिका. गैरफिल्मी साल १९३३ गांधारी रागात गायलेलं ‘झुलो ना झुलाओ री’ या गाण्याने लोकप्रियतेचे सगळे उच्चांक विक्रमी खप होऊन मोडले गेले.

अर्थात या दशकाची सुरुवात मधुर गीतांनी झाली हे सांगायला नकोच. न्यू थिएटर्सच्या इतिहासाच्या एका पानावर नियतीने आणखी एक नाव लिहिलं कानन बाला. त्यांच्या मागे ड्रीमगर्ल असं बिरूद लावावं खुशाल. पोरकेपण आणि गरिबीनं त्यांना अवघ्या आठव्या वर्षी स्टुडिओच्या दारात पोहोचवलं. १९२५च्या ‘जयदेव’ या मूकपटाचा मेहनताना २५ रुपये पडायचा, पण अवघे पाचच हाती पडले. मूकपटापासून बोलपटापर्यंत लहान बालिका, किशोरी, युवती म्हणून काम करीत राहिल्या. पडेल ते काम करताना घोडेस्वारीपासून हिंदी, इंग्रजी साहित्य शिकल्या. गाण्याचा सराव केला. रायचंद बोराल, बी. एन. सरकार, पंकज मलिक, सैगल यांच्या प्रभावळीत धिटाईने उभ्या राहिल्या.

१८ सप्टेंबर १९३७ या दिवशी कलकत्त्याच्या ‘चित्रा’ सिनेमात ‘मुक्ती’ प्रदर्शित झाला. न्यू थिएटर्सच्या ‘मुक्ती’नंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांचा मोठा दबदबा असे. चित्रीकरणासाठी बाहेर पडताना बंदोबस्तात जावं लागे.

नझरूल गीती, रवींद्र संगीतावर त्यांचे प्रभुत्व होते. खुद्द गुरुदेव रवींद्रनाथ टागोर त्यांना सन्मानाने बोलावीत असत.

पुढे खुद्द स्वतःच्या चित्रसंस्थेच्या वतीने त्यांनी शरच्चंद्र चटर्जी यांच्या साहित्यकृतींवर अकरा चित्रपट निर्माण केले. बंगालइतकेच भारतभर त्यांचे चाहते होते. त्यांची ‘तुफान मेल’ किंवा ‘ऐ चांद छूप ना जाना’ रसिकांना आजही आठवतील. सौंदर्य स्वर आणि अभिनय म्हणजे कानन बाला हे समीकरणच झालं होतं. पडद्यावरील नाव मात्र काननदेवी.

दुसऱ्या महायुद्धाचे ढग कलकत्त्यावर पसरले असता न्यू थिएटर्स डळमळली आणि कलकत्त्याची चित्रसृष्टी, कलावंत मुंबईचा रस्ता शोधून बाहेर पडले. काननदेवी मात्र तिथेच राहिल्या. वंग साहित्यातून रजतपटावर येऊन त्या व त्यांच्या नायिका अजरामर झाल्या. न्यू थिएटर्स आणि सिनेमा यांच्या आरंभीच्या कोवळ्या दिवसांत एक कहाणी घडली. तिचे नायक होते प्रिन्स प्रमथेश बरूआ. आसामच्या गौरीपूर संस्थानचे राजकुमार. भारतीय संस्कृती आणि साहित्याची ओढ आणि विदेशी कला सिनेमाचे आकर्षण त्यांना होते. युवराजाला शोभेल असे अश्वारोहण, बिलियर्डस वगैरे साहस, क्रीडा यात ते प्रवीण होते; पण चित्रपटनिर्मिती, पात्ररचना, संवाद, कॅमेरा याबद्दल तयार होते. त्यांना फ्रान्समधील एका संस्थेत चित्रनिर्मिती शिक्षणासाठी प्रवेश हवा होता; पण तो नाकारला गेला. तेव्हा त्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं शिफारसपत्र समोर ठेवून प्रवेश मिळवला.

बी. एन. सरकार शरच्चंद्रांच्या ‘देवदास’साठी फारसे उत्सुक नव्हते; पण बारूआंनी त्यांना पटवून दिलं आणि आव्हान स्वीकारलं. १९३५चा ‘देवदास’ प्रमथेश बारूआंनी दिग्दर्शित केला. सैगल, संगीत, कथा यांनी ‘देवदास’ ऐतिहासिक ठरला. त्याच वेळी नायिका जमुना गुप्ता यांच्या प्रेमात पडलेल्या बारूआंच्या प्रेमकहाणीची चर्चा जोरात चालत असे.

बारूआंनी स्वतःची चित्रनिर्मिती संस्था काढली. पण ‘न्यू थिएटर्स’साठी शरदबाबूंच्या ‘गृहदाह’ कादंबरीवर मंझिल काढला. काननदेवींना घेऊन ‘जबाब’ काढला. लोकप्रियता, यश-अपयश यांनी हुलकावणी द्यावा असा चित्रनिर्मितीचा उद्योग या राजकुमाराला झेपला नाही. व्यसनाधीनतेने अकालीच त्यांना ओढून नेले. बंगालच्या भूमीवर ही अधुरी कहाणीची नोंद राहिली नाही; पण चंद्रमुखी, पारो, देवदास हे मात्र पुसले गेले नाहीत.

(लेखिका ज्येष्ठ सिनेअभ्यासक आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.