बिटकॉइनची अर्थक्रांती
esakal February 12, 2025 10:45 AM

- रोहन मगदूम, वरिष्ठ सॉफ्टवेअर आर्किटेक्ट तज्ज्ञ

कधी काळी इंटरनेटचा फक्त संवादासाठी वापर होत असे, तेव्हा कोणी विचारही केला नसेल की, आर्थिक व्यवहारही पूर्णपणे डिजिटल पातळीवर शक्य होतील. प्रगत तंत्रज्ञान आणि लोकांच्या विश्वासाने आज त्या कल्पनेला मूर्त रूप दिलं आहे - ‘बिटकॉइन!’ कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट दोन लोकांमध्ये व्यवहार करणाऱ्या या चलनाने पारंपरिक बँकिंग व्यवस्थेला एक वेगळेच आव्हान दिले आहे. ‘ब्लॉकचेन’वर आधारित हे चलन मर्यादित पुरवठा, अस्थिर किंमत आणि मोठ्या संधी अशा विविध पैलूंमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा विषय ठरला आहे.

सतोशी नाकामोटो या व्यक्तीने २००९मध्ये बिटकॉइनची सुरुवात केली. जगातील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, बँक किंवा सरकारी नियंत्रणाशिवाय व्यवहार करणे शक्य होईल का, हा सतोशींचा मुख्य प्रश्न होता. याच विचारातून जन्मलेले बिटकॉइन पारंपरिक चलनापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इथे कुणीही एकटे विश्वस्त नसून सर्व वापरकर्ते एकमेकांशी जोडलेले असतात.

ब्लॉकचेन

बिटकॉइनमध्ये कोणतीही मध्यवर्ती बँक नसतानाही व्यवहार अतिशय सुरक्षित कसे राहू शकतात? याचं उत्तर आहे ब्लॉकचेन. पारंपरिक बँक व्यवहार एकाच डेटाबेसमध्ये नोंदवले जातात, तर ब्लॉकचेनमध्ये प्रत्येक व्यवहार ‘ब्लॉक’ म्हणून संपूर्ण नेटवर्कमध्ये साठवला जातो. हे ब्लॉक एकमेकांशी साखळीसारखे जोडले जातात. त्यामुळे एकट्या व्यक्तीस मनमानी बदल करणं जवळपास अशक्य होतं. विकेंद्रीकरणाने फसवणुकीची शक्यता कमी झाली, तर विश्वासाचे प्रमाण वाढले.

मर्यादित पुरवठा :

‘डिजिटल सोने’

बिटकॉइनची संख्या केवळ दोन कोटी दहा लाख इतकीच मर्यादित असेल, म्हणून अनेक जण त्याला ‘डिजिटल सोने’ संबोधतात. मर्यादित संसाधनाला नेहमीच किंमत असते, याचा प्रत्यय बिटकॉइनने दिला. सुरूवातीला किमान किंमतीत मिळणारे बिटकॉइन नंतर गगनाला भिडले आणि जगभरातील गुंतवणूकदारांनी या चलनाकडे उत्सुकतेने पाहायला सुरुवात केली.

विकेंद्रीकरणाची ताकद

बँकांद्वारे पैसे पाठवायचे असल्यास आपण बँकेवर अवलंबून असतो. परंतु बिटकॉइनची रचना अशी की, थेट दोन लोकांमध्ये व्यवहार होतो, ज्यामध्ये कोणताही मध्यस्थ नसतो. हे विकेंद्रीकरण असल्यामुळे व्यवहार कमी खर्चात, जलदगतीने आणि पारदर्शकपणे पूर्ण होतात. तंत्रज्ञानावर आधारित असा आर्थिक स्वातंत्र्याचा प्रयोग अनेकांना आकर्षित करतो, तर काहींना तो संशयास्पद वाटतो.

जोखीम, कायदेशीर मर्यादा

बिटकॉइनची किंमत अत्यंत अस्थिर आहे. कधी थेट शिखरावर जाणारी, तर कधी मोठी घसरण दाखवणारी. त्यामुळे त्यात मोठा नफा मिळू शकतो, तशीच जोखीमही खूप आहे. काही देशांनी बिटकॉइनला मान्यता दिली असली, तरी काहींनी याच्यावर बंधनं घातली आहेत. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी स्थानिक कायदे, कर नियम आणि तांत्रिक ज्ञान असणे गरजेचे ठरते.

भविष्यातील शक्यता

काही लोक बिटकॉइनमध्ये थेट व्यवहार करतात, तर काहींना ते गुंतवणूक म्हणून अधिक पसंत आहे. खर्च कमी, वेगवान व्यवहार आणि जागतिक पातळीवर सहज देवाणघेवाण ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तंत्रज्ञानावर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहारांना नवा चेहरा देण्यात बिटकॉइन पुरेपूर सक्षम आहे.

बिटकॉइन हे फक्त डिजिटल चलन नाही, तर मध्यस्थांविना ‘स्वतंत्र वित्तीय विश्व’ उभारण्याचा प्रयत्न आहे. बँकिंगच्या पारंपरिक पायाभूत रचनेला थेट आव्हान देणारा हा प्रयोग भविष्यात अर्थव्यवस्थेची व्याख्या बदलू शकतो. जग झपाट्याने डिजिटल होत असताना, या नव्या आर्थिक लाटेत सामील व्हायचं की, बाहेर राहायचं हे अंतिमतः तुमच्याच हातात आहे!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.