'रिव्हर्स इंजिनिअरिंग'ला हवी चौकस बुद्धिमत्ता!
esakal February 12, 2025 10:45 AM

- कमलेश जोशी, संचालक - स्वीफ इंजिनिअरिंग प्रा.लि.

कोणतीही वस्तू, उत्पादन पाहताना ते कसे तयार झाले असेल? हा विचार साहजिकच आपल्या मनात येतो. आपल्यापैकी काही जण घरच्या घरी छोट्या-मोठ्या वस्तू उघडून पाहतात आणि नंतर पुन्हा त्या जशाच्या तशा तयार करतात. सहज घडणाऱ्या या गोष्टी जेव्हा शास्त्रशुद्ध तांत्रिक पद्धतीने केल्या जातात, तेव्हा त्याची उपयुक्तता निश्चितपणे वाढते.

‘इंजिनिअरिंग’ आणि ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ काय फरक आहे?

‘इंजिनिअरिंग’मध्ये कोणतीही वस्तू कशी तयार करायची? एखाद्या यंत्राची बांधणी कशी असावी लागते? हे शिकवलं जातं, त्याचा अभ्यास केला जातो. मात्र, याउलट एखादी वस्तू, उत्पादन तयार आहे, तर ते संपूर्णपणे उघडून पुन्हा त्याची आधीसारखी बांधणी करणं म्हणजे ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’! सोप्या शब्दांत सांगायचं, तर हा असा मूळ फरक आहे.

‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ करण्याची गरज का भासते?

हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. एखादी वस्तू तयार असताना ती उघडायची आणि नंतर पुन्हा आधीसारखी तयार करायची, हे का? असा प्रश्न कित्येकदा पडतो. त्यामागे कारण असं की, प्रत्येक देश तंत्रज्ञानाच्या दृष्टीने तेवढा प्रगत असतोच असं नाही, एखादं उत्पादन करण्याचा खर्च प्रत्येक देशाला परवडतोच असं नाही. अशा वेळी ते उत्पादन कसं तयार झालं हे पाहून ते तसंच्या तसं आपल्या इथे बनवता येईल का, हे पाहण्यासाठी ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ करण्याची गरज भासते. सरकार अनेक प्रोजेक्टचे ‘आर अँड डी’ करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. उदा. एखाद्या दृष्टीने प्रगत ड्रोन तयार केले असतील, तर त्या देशाने तसे ड्रोन करण्यासाठी तंत्रज्ञान, कौशल्य, मनुष्यबळ सगळं वापरलेलं असतं. मग पुन्हा तेच करण्याने काहीही साध्य होत नाही. अशा वेळी त्याचं ‘डुप्लिकेशन’ म्हणजे ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ केलं, तर वेळ व पैशाची बचत होते.

‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’चं शिक्षण कुठे मिळतं?

अद्याप तरी याचा विशिष्ट अभ्यासक्रम आहे असं माझ्या ऐकिवात नाही. ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ करण्यासाठी आधी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं पाहिजे असं मला वाटतं. मात्र, तशी अट आहे असं नाही. ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ हा भाग पूर्णतः तुमची चौकस बुद्धी, आवड आणि निरीक्षणशक्ती यावर अवलंबून असतो. आपल्या घरी एसी दुरुस्त करायला येणारा उच्च-शिक्षित किंवा पदवीधर असतो असं नाही. मात्र, त्या गोष्टीचं मूलभूत ज्ञान, प्रात्याक्षिक आणि दुरुस्तीचं तंत्र माहीत असतं. ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’मध्ये हे आवश्यक आहे.

‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ करताना

  • तुम्हाला कोणत्या प्रकारच्या उत्पादनांमधलं कळतं, आवड आहे ते अभ्यासून ‘प्रॉडक्ट लाइन’ ठरवा. केवळ एका उत्पादनावर अवलंबून राहू नका.

  • ‘डुप्लिकेशन’साठी तयार असलेलं उत्पादन घेतलं, तर गोष्टी थोड्या सोप्या होतात. सर्व काही नव्याने बघावं लागत नाही.

  • ‘आर अँड डी’ करताना आपल्या आधी काय काम झालं आहे आणि मार्केटची गरज काय आहे, हे ओळखा.

(शब्दांकन : मयूर भावे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.