पिंपरी, ता. १२ ः ‘समाजाच्या सात्त्विकतेसाठी शुद्ध आचारविचारांची गरज असते.’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. इंद्रायणीनगर येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालय येथे झालेल्या वार्षिक शब्दोत्सव उपक्रमार्तंगत आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. पिंपरीतील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी अध्यक्ष कृषिभूषण सुदाम भोरे, प्राचार्य सदाशिव कांबळे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती आदी उपस्थित होते. यावेळी प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, मानवस्त्र, पुष्पगुच्छ आणि ‘समग्र बाबा भारती’ हा ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार पीतांबर लोहार (लोकशिक्षक बाबा भारती पारदर्शक पत्रकारिता पुरस्कार), संविधान अभ्यासक आर. जी. गायकवाड (लोकशिक्षक बाबा भारती धम्मभूषण पुरस्कार), निवेदक प्रा. दिगंबर ढोकले (लोकशिक्षक बाबा भारती शब्दप्रतिभा पुरस्कार), कवयित्री सीमा गांधी व प्रतिमा काळे (लोकशिक्षक बाबा भारती काव्यप्रतिभा पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात आले.
मुख्य संयोजक पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी स्वागत केले. प्रभाकर वाघोले, रवींद्र भारती, जयश्री श्रीखंडे, बाजीराव सातपुते, निमिष भारती, प्रदीप गांधलीकर, प्रीतम प्रकाश महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी संयोजनात सहकार्य केले. अरुण गराडे यांनी आभार मानले.