पुणे : दिल्ली येथे होणारे ‘९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ अवघ्या दहा दिवसांवर आले असतानाही अद्याप संमेलनाची कार्यक्रम पत्रिकाच जाहीर झाली नाही. त्यामुळे संमेलनातील कोणते परिसंवाद, चर्चासत्र, मुलाखती होणार आहेत, याचा रसिकांना पत्ताच नाही.
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत संमेलन होणार आहे. जवळपास ७० वर्षांनंतर देशाच्या राजधानीत ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ होत असल्याने या संमेलनाविषयी मराठीजनांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, अद्याप संमेलनाची सविस्तर कार्यक्रम पत्रिकाच निश्चित करण्यात आली नाही. केवळ संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आणि समारोपाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, तिन्ही दिवसांच्या सविस्तर वेळापत्रकाची घोषणा झाली नाही.
दरम्यान, काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणारे नेते, अभिनेते यांच्या वेळा आणि उपलब्धता निश्चित होत नसल्यामुळेदेखील कार्यक्रम पत्रिका अंतिम करण्यास विलंब होत असण्याची शक्यता आहे.
इच्छुकांचा हिरमोड होण्याची शक्यतायंदा संमेलन दिल्लीत असल्यामुळे विविध परिसंवादामध्ये आणि कविसंमेलनात सहभागी होण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचेही समजते. संमेलनाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आणि कार्यक्रमांची संख्या यंदा मर्यादित ठेवल्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.