अकोले : तालुक्याला रेल्वेच्या नकाशावर आणणाऱ्या शहापूर ते शिर्डी रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत सर्वेक्षणासाठी राज्य शासनाने प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार लहामटे यांनी सांगितले.
अकोले तालुक्याला रेल्वेने जोडण्यासाठी शहापूर (ठाणे), डोळखांब, भंडारदरा, अकोले, संगमनेर, शिर्डी, साईनगर, असा रेल्वे मार्ग व्हावा, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. राज्यात होणारे नवीन रेल्वेमार्गांचा निम्मा खर्च राज्य शासन करते. त्यामुळे रेल्वेकडे राज्य शासनामार्फत प्रस्ताव जाणे गरजेचे असते. डॉ. लहामटे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली व त्यांच्याकडे सर्वेक्षणासाठी राज्य शासनाने रेल्वेकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना यावर पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
मध्य रेल्वेवरील आसनगाव (शहापूर) ते साईनगर-शिर्डी, असा रेल्वेमार्ग झाल्यास अकोले तालुका थेट मुंबईशी रेल्वेने जोडला जाईल. अकोल्यातील भाजीपाला, पिके, दुधाला मुंबईची बाजारपेठ उपलब्ध होईल. हा नाशवंत माल वेळेत मुंबईला पोहोचेल.
आदिवासी तालुक्याच्या विकासासाठी हा रेल्वेमार्ग महत्त्वाचा ठरेल. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात या रेल्वेमार्गाचे महत्त्व व त्याची आवश्यकता डॉ. लहामटे यांनी निदर्शनास आणून दिली आहे. मध्य रेल्वेवरील आसनगाव, शहापूर, अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातून हा मार्ग जाणार आहे, तसेच कसारा घाटालाही पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे-नाशिक या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात कोणताही बदल करू नये. मूळ मार्गच कायम ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली.
‘तालुक्यात पर्यटन वाढेल’तालुक्याच्या पश्चिम भागात भंडारदरा धरण, सांदणदरी, कळसुबाई, हरिसचंद्रगड, रतनगड आदी गडकिल्ले, पुरातन मंदिरांना मुंबई, ठाणे परिसरातील पर्यटकांची संख्या वाढेल. शिर्डीतील पर्यटकही येऊ शकतील. पर्यटन व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. व्यापारी, व्यावसायिकांना एकाच दिवसात मुंबईला जाऊन परतणे शक्य होणार आहे.
‘देवठाण स्टेशन कायम ठेवावे’पुणे-नाशिक प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात अकोल्यातील देवठाण येथे स्टेशन होते; मात्र बदललेल्या आराखड्यात ते नाही. ते कायम ठेवावे, अशी मागणीही केली आहे. यासंदर्भात त्यांनी रेल्वेच्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.