लुसी कुरियन प्रेरणादायी व्यक्तींच्या यादीत
रत्नागिरी, ता. १३ : माहेर संस्थेच्या संस्थापिका, संचालिका सिस्टर लुसी कुरियन जगातील १०० प्रेरणादायी व्यक्तीमत्वांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. कॉल मॅगझिनने ही यादी जाहीर केली आहे. रत्नागिरीच्या माहेर शाखेत सि. लुसी यांचा सत्कार करण्यात आला.
१९९१ मध्ये कॅथोलिक नन लुसी कुरियनचे आयुष्य बदलून टाकणारा तो दिवस होता. रात्री कॉन्व्हेंटमध्ये गर्भवती महिलेला आश्रय देण्यास परवानगी न मिळाल्याने आणि दुसऱ्या दिवशी तिला परत येण्यास सांगितल्यानंतर तिच्या मद्यधुंद पतीने कॉन्व्हेंटसमोर गर्भवती पत्नीवर पेट्रोल ओतून पेटवून दिले. कॉन्व्हेंटसमोर तिचा करूण अंत झाला. त्या क्षणी सिस्टर लुसी यांनी शपथ घेतली की, ती पुन्हा कधीही कोणालाही दूर करणार नाही. त्यांनी माहेर संस्थेची स्थापना केली. सात राज्यांत ६५ आश्रयस्थाने उघडली. यामुळे लाखभर लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला. सिस्टर लुसी कुरियन यांची जगातील प्रेरणादायी व्यक्तींच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर निवड झाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.