WPL 2025: स्मृती मानधनासमोर जेतेपद राखण्याचे आव्हान; तिसऱ्या हंगामात ३ भारतीय अन् २ परदेशी कर्णधार भिडणार
esakal February 14, 2025 02:45 AM

WPL 2025 Starts From Tommorow : उद्यापासून (१४ फेब्रुवारी) महिला प्रिमिअर लिगच्या तिसऱ्या हंगामाला सुरूवात होणार आहे. डब्लूपीएलच्या पहिल्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले. तर दुसऱ्या हंगामात स्मृती मानधनाच्या आरसीसबीने ट्रॉफी जिंकली. त्यामुळे आता तिसऱ्या हंगामात कर्णधार स्मृती मानधनासमोर जेतेपद राखण्याचे आव्हान असणार आहे. तर तिला हरमनप्रीत कौर, दिप्ती शर्मा या भारतीय आणि मेन लॅनिंग, बेथ मूनी या परदेशी कर्णधारांचा सामना करावा लागणार आहे.

वडोदरा, बंगळूरू, लखनौ व मुंबई या ४ ठिकाणी महिला प्रिमिअर लीगचे सामने खेळवण्यात येणार आहेत. १३ मार्च रोजी सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येईल. तर अंतिम सामना १५ मार्चला होईल.

लीगपूर्वी कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने आपल्या संघातील खेळाडूंवर विश्वास दाखवला. त्याचबरोबर त्यांची कामगिरी पाहण्यासाठी उत्सुक असल्याचेही तीने सांगितले. स्मृती म्हणाली, "आमचा लिलाव चांगला झाला आणि आमच्यासाठी देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम देखील गुणवत्तेच्या दृष्टीने प्रभावी होता. मी काही खेळाडूंबद्दल खूप उत्सुक आहे. प्रेमा रावत ही एक प्रतिभावान खेळाडू आहे, राघवी बिस्टमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि कनिका आहुजा दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. त्यामुळे डब्ल्यूपीएलमध्ये त्यांची कामगिरी पाहण्यासाठी मी उत्सुक आहे."

त्याचबरोबर मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरनेही या हंगामात खेळण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली. यावेळी तीने खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये WPLसाठी तयारी केली असल्याचे सांगितले. हरमनप्रीत म्हणाली, "मी खूप उत्साही आहे कारण या हंगामात सर्व संघांनी खूप चांगले खेळाडू निवडले आहेत. गेल्या हंगामात आम्ही असे खेळाडू पाहिले ज्यांनी चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. या वर्षी मला आणखी स्पर्धात्मक स्पर्धेची अपेक्षा आहे कारण देशांतर्गत क्रिकेटपटूंनी या संधीसाठी पूर्ण तयारी केली आहे.”

यावेळी डब्ल्यूबपीएलमध्ये आणखी एका भारतीय कर्णधाराची एन्ट्री झाली आहे. युपी वॉरियर्सने ऑस्ट्रेलियन खेळाडू एलिसा हिली हिच्याकडून कर्णधारपद काढून भारतीय अष्टपैलू दिप्ती शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. एलिसा हिली ही ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार आहे, पण यावेळी डब्ल्यूपीएलमध्ये डीएसपी दिप्ती शर्मा युपी वॉरियर्स संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.